
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे. पीडित तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार कुल हे आरोपी भावांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या मोबाईलवर राहुल कुल हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्टेटस ठेवले आहे, असा आरोप तरुणीच्या आईने केला.
आमदार राहुल कुल हे आरोपींना मदत करत आहेत. मी पण तुमच्याच तालुक्यातली आहे. पण मला भेटायला यावं, असं राहुल कुल यांना वाटलं नाही. माझी मुलगी परत यावी, यासाठी आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मला मदत करावी, असे तरुणीच्या आईने म्हटले. आरोपींचा चुलता माजी सरपंच अझर शेख याने कुल यांचा फोटो स्टेटसवर ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असा मजकूर त्यावर लिहिला होता.


























































