भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी लाटल्या आदिवासींच्या जमिनी

भाजपचे वादग्रस्त आमदार नरेंद्र मेहता यांनी आदिवासींच्या शेत जमिनी लाटल्या असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेहता यांनी मे. सेव्हन इलेव्हन कन्ट्रक्शन कंपनीच्या नावाने वरसावे येथील 40 गुंठे जमिनीवर डल्ला मारला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी पोलीसांकडे धाव घेऊनही न्याय मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी सताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.

गेली अनेक वर्षे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नरेंद्र मेहता यांनी डल्ला मारला आहे. आदिवासी संरक्षित कुळ असताना तसेच ती जमीन ते कसत असताना आदिवासींना मेहता यांनी बेघर करत वरसावे येथील 40 गुंठे जमीन हडप केली आहे. त्यात 31 गुंठे लागवड आणि 9 गुंठे पोटखराबी जमीन आहे.

ती जमीन शेतकऱ्याला कोणतीही सूचना न देता मेहता यांनी सातबारा व फेरफार दुसऱ्याच्या नावे केले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करा

याप्रकरणी मनसेच्या स्थानिक पदाधिकारी आणि आदिवासींनी आज पत्रकार परिषद घेत भंडाफोड केला. तसेच बेकायदेशीर काम करणाऱ्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी शेतकरी विनायक माळी यांनी केली आहे. आमच्या कसत्या जमिनी लाटल्याने प्रपंच चालवायचा कसा अस प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.