भाजप आमदाराचा काँग्रेस सरकारला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अवघ्या 80 तासात भाजपचे सरकार कोसळले. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजीनामा दिला. आता मध्यप्रदेशमध्येही भाजप आमदाराने काँग्रेस सरकारला पाठिंबा दिल्याने भाजप नेत्यांमध्ये धकधक वाढली आहे.

मध्यप्रदेशमधील भाजप आमदार शरद कोल यांनी कमलनाथ सरकारचे तोंडभरून कौतुक केले. तसेच विधानसभेत त्यांनी सत्ताधारी काँग्रेसने मांडलेल्या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी कोल हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आणि मंत्री असलेले जितू पटवारी यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले. ही भेट तर चर्चेचा विषय होतीच शिवाय भेटीनंतर पटवारी यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे.

कोल म्हणाले की मी भाजपचाच आमदार आहे. तसेच विकासकामासाठी आपण मंत्री महोदयांना भेटलो. मी लोकप्रतिनिधी आहे, विकास कामात अडचणी येतात तेव्हा या सोडवण्यासाठी मी मंत्र्यांची भेट घेत असतो. पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. काँग्रेसकडे मध्य प्रदेशात बहुमत नाहीये. तिथे काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त एक मत हवं आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पटवारी यांना तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी येणाऱ्या काळात कळेलच असं मोघम उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे भाजप नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठी 116 जागांची गरज आहे. काँग्रेसला 115 जागा मिळाल्या असून भाजपला १०७ जागा मिळाल्या आहेत. भाजप मध्य प्रदेशात फोडाफोडी करणार का अशी चर्चा असताना भाजपचेच आमदार काँग्रेसच्या गळाला लागतायत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.