
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लैंगिक छळ, अत्याचाराविरोधात बॉलीवूड, प्रसारमाध्यमे आणि अन्य क्षेत्रांतील महिला जाहीरपणे बोलू लागलेल्या असताना भाजपचे दिल्लीचे खासदार डॉ. उदित राज यांनी मात्र या चळवळीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप करून काय उपयोग? दोन-चार लाख रुपयांसाठी या महिला आरोप करतात. या चळवळीतून चुकीच्या प्रथेला सुरुवात होत आहे, असे डॉ. राज यांनी म्हटले आहे.
डॉ. उदित राज यांनी आज ट्विटरवर ‘मी टू’ चळवळीबाबत भाष्य केले. ‘मी टू’सारखी चळवळ आवश्यक आहे; पण एखाद्या व्यक्तीवर 10 वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप करून काय उपयोग? इतक्या वर्षांनंतर या आरोपांमधील सत्यता कशी पडताळून पाहता येईल? ज्या व्यक्तीवर हे आरोप केले जातील त्या व्यक्तीच्या प्रतिमेचे किती नुकसान होईल हेदेखील बघितले पाहिजे. ‘मी टू’ चळवळीतून एका चुकीच्या प्रथेला सुरूवात होत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणारी तरुणी तिच्या पार्टनरवर बलात्काराचे आरोप करून पोलिसांकडे गुन्हा दाखल करू शकते आणि तो तुरुंगातही जाऊ शकतो. हे कसं शक्य आहे?असा अनुभव रोज येतोच आहे. ब्लॅकमेलिंगसाठी तर याचा कापर होत नाही ना, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
























































