भाजप-राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये कुत्र्यांवरून जुंपली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने बुधवारी महासभेत कुत्र्यांची पिल्ले आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांची पिल्ले सभागृहात नेण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला, तर कुत्र्याची पिल्ले लहान असून, त्यावर अत्याचार करणाऱ्या, त्यांचे प्रदर्शन करविणाऱ्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याविरोधात ‘पेटा’अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केली. त्यावरून महासभेत राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांची चांगलीच जुंपली. या गोंधळातच पहिल्यांदा 10 मिनिटे अन् दुसऱ्यांदा गुरुवार, 27 सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत महासभा तहकूब करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सप्टेंबर महिन्याची महासभा पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिशवीतून कुत्र्यांची पिल्ले आणली होती. तथापि, सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. कुत्र्याची पिले सभागृहात घेऊन जाण्यास मनाई केली. तोवर महासभेत भाजप नगरसेवकांनी भाषणबाजी करत कुत्र्याची पिल्ले लहान आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांची हेळसांड केली जात आहे. दत्ता साने यांच्यावर प्राणिमित्र कायद्यान्वये (पेटा) गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली.
स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे म्हणाल्या, एखाद्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक्या प्राण्यांचा छळ करण्याची ही कोणती पद्धत आहे. सोयीच्या राजकारणासाठी प्राण्यांची छळवणूक करणाऱ्या दत्ता साने यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, विरोधी पक्षनेत्याने त्यांचे काम करावे; परंतु मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. विकास डोळस म्हणाले, विरोधकांनी प्रशासनावर राग काढावा. राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा बाता मारायच्या आणि दुसरीकडे हे शहर कुत्र्यांचे शहर बनवायचे हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला तरी ते प्रतिसाद देत नाहीत. आंदोलन केले नाही, तर प्रश्न सुटणार कसे? प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे.

अपक्ष नीता पाडाळे म्हणाल्या, शहरात कुत्रे, डुकरांचा सुळसुळाट आहे. नागरिकांच्या घरात डुकरे शिरतात तरीदेखील त्यांचा बंदोबस्त केला जात नाही. डुकरांना पकडण्यासाठी हप्ते घेतले जातात. भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, शहर प्राणीसंग्रहालय झाले आहे. डुकरे, कुत्री, भाकड जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, महापौर, सभागृह नेत्यांच्या विनंतीनुसार आम्ही कुत्र्यांची पिल्ले सभागृहात आणली नाहीत. त्यांचे ऐवूâनदेखील माझ्यावर गुन्हा दाखल करा असे म्हणणे गैर आहे. मी 96 कुळी शेतकरी आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, स्वाइन फ्लूमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून आंदोलक नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू झाली आहे. शहरात कुत्री, डुकरांचा सुळसुळाट सुरू झाला असून, कुत्र्यांची पिल्ले आणण्यामागची भावना समजून घेणे अपेक्षित आहे. भाजप नगरसेवक प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात, हे चुकीचे आहे.

यादरम्यान राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. महापौर राहुल जाधव यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना मांडली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. सभा सुरू होताच सभागृह नेते एकनाथ पवार यांनी 96 कुळी शेतकरी शब्द सभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची सूचना करत सभा 27 सप्टेंबरपर्यंत सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले.

96 कुळी शेतकरीवरून तणातणी
ह मी शहाण्णव कुळी शेतकरी आहे. पाळीव प्राण्यांची कशी काळजी घेतले जाते हे आम्हास चांगलेच ठावूक आहे, या दत्ता साने यांच्या विधानाचा भाजपने निषेध केला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांची उणीधुणी काढली. साने म्हणाले, मी 96 कुळी शेतकरी असून, गाय म्हैस, बैल, कुत्रा, मांजर ही जनावरे पाळण्याची आमची संस्कृती आहे. या सर्व प्राण्यांकडे आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहतो. त्यांना पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही. उलट 96 कुळी या शब्दाबाबत राजकारण करून भाजप हीन राजकारण करत आहे. जी कुत्र्याची पिले आणली होती, ती सहा महिन्यांची होती. त्यांना ज्या पिशवीत आणले होते त्या पिशवीला छिद्रे होती. पिशवीत हवा खेळती राहील याची दक्षता घेतली होती. सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, स्टंटबाजी करणे राष्ट्रवादीची संस्कृतीच आहे. आंदोलन सनदशीर मार्गाने करावे. विकास डोळस म्हणाले, दत्ता साने यांनी उपरोधिकपणे मी 96 कुळी शेतकरी आहे, असे जातीवाचक विधान केले. त्याचा आम्ही निषेध करतो. आशा शेंडगे म्हणाल्या, महिला सदस्यांना जातीवाचक बोलणे हे निंदनीय आहे. पुरोगामी म्हणून मिरविणाNया राष्ट्रवादीची नवी संस्कृती आहे. जातीवाचक बोलणे चुकीचे आहे.