मिंध्यांच्या बेकायदा कंटेनर शाखांना भाजपचा विरोध; मीरा-भाईंदर बकाल करणारे हे लोखंडी खोके तत्काळ हटवा

राज्यातील सत्तेचा गैरफायदा घेत मीरा, भाईंदरमध्ये मिंधे गटाने वर्षभरापूर्वी कंटेनर शाखांची दुकाने उघडली होती. याला विरोध झाल्यानंतर काही कंटेनर हटवले. मात्र आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा शहरात बेकायदा कंटेनर शाखा फोफावत आहेत. शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या या कंटेनर्सना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता उघडलेल्या बेकायदा कंटेनर शाखांची दुकानदारी तातडीने हटवावीत, अशी मागणी खुद्द भाजपने केली आहे.
बेकायदा बांधकामांची बजबजपुरी असलेल्या मीरा, भाईंदरमध्ये मिंधे गटाने तर कहरच केला आहे. फुटपाथ, नाले, मोकळ्या जागा अडवून त्या ठिकाणी भलेमोठे कंटेनर ठेवले आहे. या कंटेनरमध्ये मिंधे गटाने शाखा उघडल्या आहेत. वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने कंटेनर शाखा ठिकठिकाणी उभ्या केल्या होत्या. मात्र नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने काही शाखांवर कारवाई केली होती. मात्र आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा बेकायदा कंटेनर शाखांची दुकाने उघडली जात आहेत.
न्यायालयाचा अवमान
मीरा, भाईंदर शहरात जवळपास गल्लोगल्ली या कंटेनर शाखा उघडण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात जास्त कंटेनर शाखेने या फुटपाथ व रोडवर कब्जा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून या कंटेनर शाखा सुरू आहेत.
 
रहदारीला अडथळा, मोक्याच्या जागा हडप
मिंधे गटाने पहिल्यांदा नोव्हेंबर 2023 मध्ये मीरा-भाईंदरच्या विविध रस्त्यांलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत कंटेनर शाखा उभारल्या आहेत. रस्ते अडवून कंटेनरचे सांगाडे उभे केल्याने रहदारीला अडथळे निर्माण होऊन अपघात वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध केला होता. न्यायालयानेही शहरातील अनधिकृत बांधकामे, टफ्ऱ्या हटवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालिकेने काही कंटेनर हटवले होते. मात्र पुन्हा एकदा प्रशासनाला हाताशी धरून मोक्याच्या जागा हडप करण्याचा घाट मिंधे गटाने घातला आहे.
काशिमीरा येथील माशाचा पाडा, जनतानगर, धर्मवीर आनंद दिघे चौक, स्वर्गीय मीनाताई ठाकरे हॉल येथील बसथांब्याजवळ कंटेनर ठेवण्यात आले आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सत्तेत भागीदारी असलेल्या भाजपनेच या बजबजपुरीला विरोध केला असून भाजप युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष मंगेश मुळे यांनी हे बेकायदा कंटेनर तातडीने हटवावेत, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.