
भाजपाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज, मराठी साम्राज्य आणि मराठी माणूस यांच्याविषयी अजिबात प्रेम नाही. खरोखर प्रेम असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱया राज्यपालांना जाब विचारला असता, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना भेटून राज्यपाल ताबडतोब बदला असे सांगितले असते. पण, तसे केले नाही, हे लोक ढोंगी आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. खासदार संजय राऊत हे नाशिक येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कुठे आहेत मुख्यमंत्री?
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा करणाऱया मुख्यमंत्र्यांचा त्यांनी समाचार घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय महाराष्ट्रात आहेत. योगी आदित्यनाथ मुंबईला येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचे वऱहाड-बिऱहाड गुंतवणूक आणण्यासाठी पुढच्या महिन्यात जर्मनीला निघालेत. इकडचे प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱया लोकांवर बोलायची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्र्यांची वाचा गेलेली असते का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
मी घाबरत नाही
माझ्याशी एकतर चांगल्या वृत्तीने ओळख ठेवा, असे त्यांनी नारायण राणेंना सुनावले. राजकीय मतभेद असले तरी आम्ही आतापर्यंत संयम राखला असून, यापुढेही राखू. आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आमच्या नादाला लागू नका. मी घाबरत नाही, पळपुटा नाही. एजन्सीला, खोटय़ा प्रकरणांना घाबरत नाही. माझ्या पक्षासाठी आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही संकटाला
सामोरा जाण्यास तयार आहे, असे त्यांनी
ठणकावून सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा घेणार असून, त्या तयारीसाठी आलो असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. नाशिकनंतर उद्धव ठाकरे यांची विदर्भासाठी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर सभा होईल, असेही त्यांनी सांगितले.




























































