
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लोकसभेच्या देशभरातील ५४३ जागांपैकी ४८० जागा लढवण्याचं धोरण भाजपने निश्चित केलं आहे. याचा अर्थ भाजप त्यांच्या मित्र पक्षांसाठी संपूर्ण देशात फक्त ६३ जागा सोडणार आहे. एनडीए मजबूत करण्याची भाषा वापरतानाच मित्र पक्षांना कमी लेखत स्वत:ची स्थिती मजबूत करून घेण्याच्या भाजपचे प्रयत्न यामुळे उघड व्हायला लागले आहेत. दुय्यम दर्जाची वागणूक घेत आपल्याला निवडणूक लढवायची नाहीये, हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागा असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४८० जागांची तयारी करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे ४८ जागा लढवायचे आदेशही त्यांनी दिल्याचं या वृत्तात म्हटले आहे. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पंजाब या राज्यांमधून किमान ५० जागा वाढवण्याचं लक्ष भाजपने पदाधिकाऱ्यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकी भाजपने ४२८ जागा लढवल्या होत्या ज्यापैकी २८२ जागा भाजपने जिंकल्या होत्या.
























































