ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच! आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांची सत्ता गेली, ज्यांना सत्तेपासून आम्ही दूर ठेवले त्यांना वाईट वाटणारच, मात्र त्यांनी बरनॉल घ्यावे असे मी त्यांना सांगणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

व्ही.पी. नगर, वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील 228पैकी पहिल्या टप्प्यात 109 रहिवाशांना आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ज्यांनी जनतेला दिलेली वचने पाळली नाहीत ते आज सत्तेवर नाहीत. सत्ता गेली म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सांगतानाच जे ट्रोल करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देता कामा नये. हातात मोबाईल आहे म्हणजे काहीतरी त्यांना करावे लागते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

रहिवाशांना घरांचा लवकरात लवकर ताबा मिळावा यासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले तसेच उर्वरित 119 रहिवाशांसाठीही शिवसेना प्रयत्नशील असून लवकरच त्यांनाही घरांचा ताबा देण्यात येईल असे स्पष्ट केले. याप्रसंगी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, माजी आमदार सुनील शिंदे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, माजी राज्यमंत्री सचिन अहीर, विभागप्रमुख, नगरसेवक आशीष चेंबूरकर, विकासक हरीश मेहता, शाखाप्रमुख रामकृष्ण शिंदे, शाखा संघटक अनिता नायर, एसआरएचे अधिकारी व्ही.पी. नगरमधील रहिवाशी, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

22 वर्षांपासूनची घरांची प्रतीक्षा संपली

एसआरए प्रकल्पातील 228 कुटुंबीय तब्बल 22 वर्षांपासून पक्क्या घरांच्या प्रतीक्षेत होते. या कुटुंबीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले. आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नावर स्वतः विशेष लक्ष घातले. पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित असलेल्या अधिकाऱयांशी समन्वय साधून बैठका घेतल्या आणि प्रलंबित अडचणी तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. पहिल्या टप्प्यात 109 रहिवाशांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.