जुन्नरमध्ये अजित पवारांना भाजपने काळे झेंडे दाखवले, महायुतीत वर्चस्वाच्या वादातून राडे सुरू

विधानसभा निवडणुकीआधी वर्चस्वाच्या वादातून महायुतीत राडे सुरू झाले आहेत. आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. जुन्नरमधील पर्यटन आराखड्यासंदर्भात सरकारी बैठक भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व नाव अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या फलकांवर लावले नसल्यामुळे जुन्नर तालुका भाजपच्या विधानसभा प्रमुख आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेर व नारायणगाव बस स्थानकाजवळ काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शने करत आंदोलन केले.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नारायणगावात आली असताना यादरम्यान त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, पर्यटनावर काम करणारे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान आम्हाला आमंत्रण का दिले नाही किंवा आमच्या नेत्यांचे म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारमधील इतर नेत्यांचे फोटो व नामोल्लेख का केला नाही असे विचारत जुन्नर तालुका भाजपच्या आशा बुचके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तीव्र निदर्शने केली.

यानंतर पोलिसांनी आशाताई बुचके व भाजपचे कार्यकर्ते यांना नारायणगाव पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे खोटे सांगून त्यांना वेगळ्याच ठिकाणी पोलीस नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर आशा बुचके संतापल्या. यावेळी त्यांच्यासह संतोष नाना खैरे, आशिष माळवदकर, भगवान घोलप, दिलीप गांजाळे, व भाजपचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झाले व त्यांनी अजित पवार व अतुल बेनके यांचा शिवराळ शब्दात निषेध केला.

यादरम्यान जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक संतोष नाना खैरे, नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबू पाटे, संतोष वाजगे व इतर कार्यकर्ते यांनी आशाताई बुचके यांचे समर्थन करताना पालकमंत्री अजित पवार व आमदार अतुल बेनके यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

चोरून बैठका घेतात

आंदोलनादरम्यान आशा बुचके यांनी अजित पवारांवर आरोप केले. अजित पवार चोरून बैठका घेत आहेत. प्रचार सभांचा गैरवापरही करत आहेत. पर्यटन संदर्भात काही काम करत असताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. परंतु आम्हाला डावलून बैठका घेतल्या जात आहेत, असे त्या म्हणाल्या.

मिंधे गटाचा बहिष्कार

मंचरमध्ये अजित पवार यांच्या ‘जनसन्मान यात्रे’त सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लावलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या उल्लेखातून ‘मुख्यमंत्री’ हा उल्लेख काढून टाकल्याने मिंधे गट भडकला. त्यांनी अजित पवार यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

एकेरी घोषणाअजित पवारचं  करायचं काय? खाली डोकं वर पाय

या अजित पवारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!’ तसेच ‘अजित पवार मुर्दाबाद’ अशा तीव्र व एकेरी घोषणा देत स्वतः आशा बुचके व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.