पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या साथीदारांवर संजय राऊत यांनी सणसणीट टीका केली आहे. भाजपनं नकली शिवसेना आणि अजित पवार गटाला त्यांची जागा दाखवल्याचं संजय राऊत म्हणाले.
मोदी गॅरंटी, मोदी तिसरी बार, मोदी है तो मुमकीन है… या सगळं चित्र कालच्या शपथविधीवेळी नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढूनताणून त्यांनी बनवलं आहे. दोन टेकू महत्त्वाचे आहेत. या टेकूंचा इतिहास साऱ्यांना माहित आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं तर पियुष गोयल मंत्री झाले. ते शेअर बाजार, उद्योगपती यांचे मंत्री आहेत. बाकी अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला आहे. दुसरे नकली शिवसेना त्यांच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कुणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान हा पायदळी तुडवायचा इस्ट इंडिया कंपनी गुजरातनं ठरवला असेल तर हे तुडवून घ्यायला तयार आहेत. त्यांना मिळायचं असतं तर कालंच मिळालं असतं आता काही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मांझी यांच्या पक्षाचा एकच खासदार आहे तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद आहे. नकली शिवसेनेचे 7 खासदार असून त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. तुम्ही आमचे गुलाम, आश्रित आहात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
‘हे सरकार NDA चं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कुणाला एक आणि कुणाला सात जागा मिळाल्या आहेत. त्याही कशा मिळाल्या हे सगळ्यांना माहित आहे. हे भाजपचे गुलाम आणि आश्रित आहेत. हे काय करणार त्यांच्याकडे स्वाभिमान वैगरे असता तर ते राज्यमंत्रीपद त्यांनी धुडकावले असते. जितनराम मांझी यांच्याकडेही एक खासदार आहे तरी त्यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. मात्र महाराष्ट्राच्या या लोकांना जे मिळालं आहे ती त्यांची अंतर्गत गोष्ट आहे. त्यावर काही बोलण्यासारखं नाही. पण कॅबिनेट बनलं आहे. ते किती दिवस चालणार हे पाहावं लागेल. जी परिस्थिती आहे जी माहिती समोर आली आहे त्यावरून गडबड आहे असं दिसतं आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन एक विक्रम प्रस्थापित करायचा होता, तो झाला आहे. आता किती दिवस सरकार खेचायचं ते खेचतील पण त्यात देशाचं नुकसान आहे. हे व्यापारी लोक आहेत. दरदिवशी ते शेअर मार्केटशी खेळतील. त्यांचा उद्देश व्यापार करणं आहे, लूटणे इस्ट इंडिया कंपनी गुजरात. त्यांना देशाशी काही घेणंदेणं नाही. ते शपथ घेत असताना जम्मू कश्मिरात दहशतवादी हल्ला झाला, 10 जण मारले गेले. 36 जखमी आहेत. अमित शहा गृहमंत्री आहेत, जे निवडणूक प्रचारावेळी बोलत होते 370 हटवलं आणि जम्मू कश्मिरात शांती आणली. क्या झालं बघा, या आधी देखील झालं होतं आता देखील सुरू आहे. यांना मणिपूर, महागाई, वाढती बेरोजगारी कशाचीच चिंता नाही. त्यांच्याकडे कोणती योजना नाही, बस सरकार बनवायचं आहे, शेअर मार्केट चालवायचं आहे, उद्योगपतींना मदत करायची आहे, हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत त्यांना पैस वाटायचे आहेत. जनतेचा पैसा आहे लुटू शकत असाल तर लुटा’, अशी सणसणीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.