
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसने हंगामी अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड केल्याने भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री गांधी यांच्या निवडीची घोषणा करताच भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सात सेकंदांच्या या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता गुलामगिरीची असल्याची अप्रत्यक्ष टीका करण्याच आली आहे. काँग्रेस नेते एका घराण्याचे आणि घराणेशाहीते गुलाम आहेत. आई- मुलाची ते गुलामगिरी करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. शनिवारी झालेल्या पक्षाच्या कार्यकरिणीच्या बैठकीत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर करत सोनिया आणि राहुल बैठकीतून बाहेर पडले होते. मात्र, अध्यक्षपदी एकमत होत नसल्याने सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘आई-मुलाची गुलामीच’ करत राहणार अशी अप्रत्यक्ष टीका करणारा व्हिडिओ मालवीय यांनी पोस्ट केला आहे.

























































