
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत कशापद्धतीने जोडले गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबाबत पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीत सांगायचे की थोडा विचार करावा. आता पवार यांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी निगडीत व्यक्त केले. तसेच पैलवानाच्या नादाला कधी लागायचे नसते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजून पैलवानकी सोडली नाही. त्यांच्या नादाला लागू नका’, असा अप्रत्यक्ष इशाराही चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिकेतील भाजपच्या राजवटीतील कारभारावर गंभीर आरोप केले होते. त्याला चव्हाण यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाण म्हणाले, अजित पवार हे केंद्र, राज्यात आमच्यासोबत जोडले आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सल्ला देणाऱ्या संस्थेने सांगितल्याशिवाय पवार खोटे आरोप करणार नाहीत. निवडणुकीनंतर ते झाले होते, जाऊ दे असे पवार हसतहसत म्हणतील.
भाजप प्रदेशाध्यक्षांची शहराध्यक्षांना तंबी
प्रभाग क्रमांक 28 पिंपळेसौदागर मधून काटे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रचारप्रमुख नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली तिथे पॅनेल आहे. शत्रुघ्न आणि नाना काटे या दोघांनी यंदाही समोरासमोर निवडणूक लढण्याचे टाळले आहे. त्यापार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पॅनेलच्या बाहेर जाऊन कोणी प्रचार करु नये. प्रत्येकाने पॅनेलमध्ये प्रचार करावा. फुगिरी मारत बसू नये. पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत. सेटिंग करु नका, अशी तंबी’, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिली.






























































