भाजपचा डोळा मुंबईतील अमराठी मतांवर, मराठी-परप्रातीयांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान

हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाला वेगळे वळण देऊन मराठी-अमराठींमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे. मराठीचा जाहीर अपमान होत असताना भाजपकडून चकार शब्दही काढला जात नाही. विशेष म्हणजे मराठीचा अवमान करणाऱयांचे लांगूलचालन करण्यात येत आहे. अमराठींची मते मिळवण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

अमराठींकडून मराठी माणूस आणि मराठी भाषेचा वारंवार अवमान केला जात आहे. याचा जाहीर निषेध करीत शिवसेना आणि ‘मनसे’कडून चांगलाच धडा शिकवला जात आहे. असे असताना भाजप मात्र अशा मराठीद्वेष्टय़ांना अभय देत आहे. विशेष म्हणजे मराठीचा अवमान करणाऱयांवर सामाजिक तेढ निर्माण केली म्हणून कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असताना भाजप-मिंधे सरकारकडून अमराठींच्या मुजोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आता लाडक्या झाल्या दोडक्या

लोकसभा निवडणुकीत मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना राबवून सत्ता काबीज केली. मात्र आता तिजोरीतील खडखडाट असताना इतर विभागाचा निधीही या योजनेसाठी पळवला जात आहे. लाखो लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याचा डाव आहे. त्यामुळे ही गेलेली मते आता अमराठींच्या माध्यमातून मिळवण्याचा भाजपचा आटापिटा सुरू आहे.

असे आहे मतांचे गणित

– मुंबईची सुमारे 1.30 कोटींची लोकसंख्या पाहता 36,85,600 म्हणजेच 36 टक्के मराठी मतदार आहेत, तर गुजराती-राजस्थानी 14 टक्के, मुस्लिम 18 टक्के उत्तर भारतीय 17 टक्के मतदार आहेत.
– तर दक्षिण भारतीय 7 टक्के मतदार आहेत, तर ख्रिश्चन 3 टक्के आणि सिंधी-बंगाली, पारसी 2 टक्के मतदार आहेत. यामध्ये तब्बल 61 टक्के मतदार हे अमराठी आहेत. ही अमराठी मते मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.