
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दोन आठवड्यांपूर्वी हॅक झालेली भाजपची वेवसाइट शुक्रवारी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, सध्या या वेबसाइटवर एकच पान दिसत आहे. भाजपने गुरुवारी जारी केलेली पहिली उमेदवारांची यादी शुक्रवारी वेबसाइटवर दिसत होती. भाजपची वेबसाइट 5 मार्चला हॅक झाली होती. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही पक्षाची वेबसाइट हॅक झाल्याचे मान्य केले होते. मात्र, पक्षाचा डेटा चोरीला गेला आहे काय किंवा वेबसाइटचे इतर काही नुकसान झाले आहे का, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती.
5 मार्चला सकाळी भाजपची वेबसाइट उघडल्यावर त्यात अपशब्द आणि अश्लाघ्य भाषा आढळली. त्यानंतर काही वेळात ही वेबसाइट उघडणे बंद झाले आणि एरर दिसत होता. आता दोन आठवड्यानंतर पुन्हा वेबसाइट सुरू झाली आहे. मात्र, सध्या या साइटवर एकच पान दिसत आहे. त्यामुळे साइट हॅक झाल्यानंतर भाजपचा डेटा नष्ट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाची वेबसाइट हॅक झाल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते.
भाजपची साइट हॅक झाल्यावर काँग्रेसने या वेबसाइटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत तुमच्या पक्षाची वेबसाइट बऱ्याच दिवसांपासून डाऊन आहे. तुम्हाला कोणती मदत हवी असल्यास आम्हाला सांगा. तुम्हाला मदत करण्यात आम्हाला आनंद होईल, असा मेसेज टाकत भाजपला टोला लगावला होता. त्यानंतर आपच्या ट्विटवर हॅडलवरून भाजप आणि काँग्रेसची मिलीभगत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी पडेल तिथे काँग्रेस त्यांना मदत करेल असे ट्विटही करण्यात आले होते. आपने #CongressHelpingBjP हा हैशटॅगही चालवला होता. त्यामुळे भाजपची हॅक झालेली वेबसाइट हा राजकीय चर्चेचा विषय झाला होता.



























































