
‘द्वेषाचे राजकारण, जाती जातींमधील इर्षा, द्वेष, मत्सर वाढवून यातून प्रत्येक समाजाच्या घटकांमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजप कडून चालू आहे. केंद्रात पण तेच चालू आहे. राज्यात पण तेच चालू आहे. पण त्यांची सर्व प्रकारची गणितं चुकतील, हे आता जनतेने ठरवल आहे’, अशी रोखठोक प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
संगमनेर येथे लोकपंचायत आयोजित कार्यक्रमासाठी आल्या असता शासकीय विश्रामगृहावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्यात आणि केंद्रात घडणाऱ्या विविध घडामोडींवर आपले मत व्यक्त केले.
राज्यात आणि देशात धर्मात, जातीत, लोकांमध्ये जे द्वेषाचं बीज पेरले जात आहे, त्याला खतपाणी घातले जात आहे, ते वाढवलं जात आहे. यास भाजप जबाबदार असून तसे प्रयत्न सातत्याने चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की, समाजामधील झुंड बळीचा विषय असेल किंवा नावं बदलण्याचा विषय असेल या मध्ये धार्मिक द्वेषच दिसतो. हैदराबादचे भाग्यनगर तुम्ही एका रात्रीत करता पण तुम्हाला औरंगाबादचे संभाजीनगर करायला अॅलर्जी होते. अशी टीका भाजपवर करत त्या म्हणाल्या की, राज्यात आघाडी सरकारचे चांगले काम चालू आहे. असे असले तरी त्याबद्दल एक विखारी भावना ही विरोधी पक्षाच्या मनात आहे. या विखारी भावनेतून वेगवेगळे लोक वेगवेगळे विषय हाताशी घेऊन प्रत्येक घटनांना धर्माचा रंग फासण्याचे काम भाजप करताना दिसत आहे, असेही त्या म्हणाल्या.
घोटाळे सम्राट
किरीट सोमय्या कायम कोणते ना कोणते आरोप करत असतात. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नसतं. त्यातून काही बाहेरही पडत नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाकडे दिले पाहिजेत. तसं होताना दिसत नाही. अद्याप पर्यंत त्यांनी अशा अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यातून काहीच सिद्ध झालेल नाही. जवळपास चारशे ते साडेचारशे पर्यंत तक्रारी केल्या असाव्यात. सारख्या खोट्या तक्रारी पाहता त्यांना आता ‘घोटाळे सम्राट’ असेच म्हणावे लागेल अशी टीका गोऱ्हे यांनी किरीट सोमय्यांवर केली आहे.































































