
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात येऊन मतदान केले. काटोल विधानसभा मतदारसंघात 35 हजारांहून अधिक मतांची चोरी करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतील घोळावर आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून काम करत होतो. जवळपास 60 लोकांची टीम यावर काम करत होती. मतदार यादीची बारकाईने तपासणी केल्यावर शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील अनेक मतदारांची नावे येथील मतदार यादीत असल्याचे आढळून आले. काटोल विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या दोन भावांची मतदार यादीत दुबार नावे असल्याचे अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लांघा गावाच्या सरपंचांकडे दोन ओळखपत्र
मध्य प्रदेशात सीमेवर लांघा हे गाव आहे. त्या गावच्या सरपंचांनीसुद्धा काटोल मतदारसंघांमध्ये मतदान केले. लांघा गावच्या सरपंच वनिता पराडकर या भाजप कार्यकर्त्या आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणचे मतदार ओळखपत्र असल्याचा पुरावाच अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.






















































