
महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिकीट वाटणाऱया नेत्यांविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे अमरावती शहराचे निरीक्षक असून त्यांनी दारूच्या नशेत उमेदवारी वाटली आहे, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. संजय कुटे यांच्यासह अमरावती शहरातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
अमरावती महापालिका निवडणुकीत पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱया कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात दाखल झालेल्या अनेकांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पारा चढला. कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळणे आणि पदाधिकाऱयांकडून चुकीची वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ राजकमल चौकात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. पदाधिकारी म्हणून भाजपमध्ये प्रामाणिक काम केले, पण स्थानिक पदाधिकारांचे वागणे योग्य नाही. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आपल्या पत्नीला स्वतःच्या प्रभागातून उमेदवारी दिली. त्यांच्या पत्नीला आम्ही कधीही पाहिले नाही, त्या कधी पक्ष कार्यालयात आल्या नाहीत. आम्ही आंदोलन केली, पक्षाचे काम केले, असे असताना आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, असा गंभीर आरोप श्रद्धा गहलोत यांनी केला आहे.
पैशांसाठी मोडली युती
भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती होणार असल्यामुळे आम्हाला बरेच दिवस थांबवण्यात आले. बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहे, असे अखेरच्या दिवसापर्यंत सांगण्यात आले. खरे म्हणजे पदाधिकाऱयांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना उमेदवारी देणे गरजेचे होते. यामुळेच शिंदे गटासोबत भाजपने युती केली नाही. बाहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचेदेखील श्रद्धा गहलोत म्हणाल्या.




























































