
‘अॅक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो-3 या मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा उद्या, शनिवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आता आरे ते वरळी असा 23 किलोमीटरचा गारेगार प्रवास मुंबईकरांना अवघ्या 60 रुपयांत भूमिगत मेट्रोने करता येणार आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आले होते.
आरे ते कुलाबा या मेट्रो -3 मार्गाची एकूण लांबी 33.5 किमी असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड याचे काम करत आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानके असून त्यापैकी 26 स्थानके भूमिगत आहेत. त्यातील आरे ते बीकेसी हा 12.69 किमीचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी या दुसऱया टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. बीकेसी ते वरळी हा 9.77 किमी लांबीचा टप्पा असून यातील सर्व सहा स्थानके भूमिगत आहे. या टप्पा खुला झाल्यामुळे वरळी ते बीकेसी हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
वरळी ते कुलाबा मार्ग ऑगस्टपासून सेवेत
मेट्रो-3 चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच यावर्षी 50 किमी आणि पुढच्या वर्षी 50 किमी मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वरळी ते कुलाबा हा 10.99 किमीचा मार्ग असून यात 11 भूमिगत मेट्रो स्थानके आहेत.
– मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी नेत्रा राणे आणि निधी कथांनी या दोन महिला मेट्रो चालकांनी मेट्रोचे सारथ्य केले.
असे आहेत तिकीट दर
आरे ते बीकेसी – 50 रुपये
बीकेसी ते वरळी – 40 रुपये
आरे ते वरळी – 60 रुपये