अवकाशातील सर्वात मोठे कृष्णविवर; दररोज गडप करते सूर्याएवढा तारा!

937

अवकाशाबाबत मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. पृथ्वीसारखा एखादा ग्रह आहे काय, इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असतो. तसेच संशोधकांना कृष्णविवराबाबतही आकर्षण आहे. त्याबाबतची माहिती मिळवण्यात काही प्रमाणात यशही आले आहे. नुकतेच अवकाशात हृदयाप्रमाणे धडकणारे आणि ठराविक वेळेनंतर तरंगलहरी पाठवणाऱ्या कृष्णविवराचा शोध संशोधकांनी लावला होता. आता दररोज सूर्याएवढा तारा गिळणाऱ्या कृष्णविवराचा शोध संशोधकांनी लावला आहे.

कृषणविवराच्या कक्षेत येणाऱ्या सर्व गोष्टी कृष्णविवरात कायमस्वरुपी सामावल्या जातात. त्या कोठे जातात, याचे गुढ कायम आहे. कृष्णविवरात लहाममोठ्या अशनी, लहान आकाराचे ग्रह गडप होत असल्याची माहिती संशोधकांना आहे. मात्र, आता दररोज सूर्याएवढा तारा गडप करणारे आणि सर्वात वेगाने वाढणारे कृष्णविवर संशोधकांनी शोधले आहे. ते सूर्यापेक्षा 3400 कोटी पट अधिक मोठे आहे. हे कृष्णविवर दररोज सूर्याच्या आकाराचा एक तारा गिळंकृत करत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सध्या ज्या वेगाने हे कृष्णविवर वाढत आहे, तो वेग संशोधकांनी मांडलेल्या वेगापेक्षा दुप्पटीहून अधिक असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. हे संशोधन मंथली नोटीसेस ऑफ द रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटीमध्ये छापून आले आहे. या कृष्णविवराला जे 2157 असे नाव देण्यात आले आहे.

जे 2157 हे कृष्णविवर पृथ्वीपासून 120 कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. आपल्या आकशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या सॅगीटेरियर ए या कृष्णविवरापेक्षा ते आठ हजार पट मोठे आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणारे कृष्णविवर इतक्या झपाट्याने वाढले तर ते आपल्या आकाशगंगेतील दोन तृतीअंश तारे गडप करेल, असे संशोधनाचे प्रमुख असणाऱ्या ख्रिस्तोफर ऑनकेर यांनी सांगितले. ख्रिस्तोफर यांच्या सांगितले की, कृष्णविवराच्या आकारमानावर ते किती तारे गिळंकृत करु शकेल ते ठरते. हे कृष्णविवर आकाराने आधीपासूनच खूप मोठे आहे, त्यामुळेच ते दररोज सूर्याएवढा तारा स्वत:मध्ये सामावून घेत आहे. त्यामुळे त्याची वाढही झपाट्याने होत आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृष्णविवराबरोबरच हे सर्वाधिक प्रकाशित होणारे कृष्णविवर ठरले आहे. हे कृष्णविवर इतक्या वेगाने वाढत असल्याने इतर कृष्णविवरांपेक्षा हजारो पट अधिक चमकदार दिसत आहे, असे ख्रिस्तोफर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या