लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या बातम्या

युद्धनौकेवर नवी एअर डिफेन्स सिस्टम

हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढवण्यासाठी डीआरडीओने प्रोजेक्ट पी044 अंतर्गत कमी अंतरावरील एअर डिफेन्स सिस्टम व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (व्ही-शोराड्स) ला युद्धनौकेवर तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे. ही एक स्वदेशी, अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टम आहे. या एअर डिफेन्स सिस्टमद्वारे शत्रूंच्या कमी अंतरावरून उडणाऱ्या ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानाना खाली पाडण्याचे काम ही एअर सिस्टम करणार आहे. या सिस्टममुळे हिंदुस्थानी नौदलाला आणखी मजबूती मिळणार आहे. आगामी काळात जर शत्रूंनी समुद्रातून हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न केला तर तो हल्ला परतवून लावण्याची क्षमता या सिस्टममध्ये आहे. सध्या नौदलाकडे बराक-8 आणि आकाश मिसाईलसारख्या सिस्टम आहेत.

ब्लिंकिट-स्विगीला ऍमेझॉन देणार टक्कर

देशभरात सध्या 10 मिनिटात डिलिव्हरी सेवेची क्रेझ वाढली आहे. देशातील टॉप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टो, इंस्टामार्ट, स्विगी आणि ब्लिंकिटला टक्कर देण्यासाठी ऍमेझॉनने नवीन सर्विस ऍमेझॉन नाऊ सुरू केली आहे. सर्वात आधी दिल्लीतून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधी बंगळुरूमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून याला चावलण्यात आले होते. ऍमेझॉनवरून खरेदी केल्यानंतर दोन दिवस लागायचे. परंतु, आता अवघ्या 10 मिनिटात डिलिव्हरी मिळू शकणार आहे.

एक्सएआयचे लेटेस्ट मॉडल ग्रोक 4 लाँच

मस्क यांच्या कंपनीचे एक्सएआयचे लेटेस्ट मॉडल ग्रोक 4 लाँच करण्यात आले आहे. ग्रोक4 चे खास वैशिष्टय़ म्हणजे, हे प्रत्येक विषयात पीएचडी लेवलचे उत्तर देते. मस्क यांच्या एआय स्टार्टअपने 300 डॉलर प्रति महिन्याचे नवीन एआय सब्सक्रिप्शन प्लान सुपर ग्रोक हेवी हेसुद्धा लाँच केले आहे. नवीन ग्रोक 4 हे ओपनएआय, गुगल आणि अँथ्रोपिक सारखे मॉडल आहे. हे मॉडल इमेज ऍनालिसिस करू शकते. प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. एक्सएआयचा दावा आहे की, ग्रोक 4 चा जबरदस्त परफॉर्मन्स आहे.

लिंडा याकारिनो यांनी एक्सचे सीईओ पद सोडले

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करून त्यांनी ही माहिती दिली. याकारिनो यांनी जून 2023 मध्ये एक्सचे सीईओपद सांभाळले होते. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, सीईओ पदावरून बाजूला होण्याचा निर्णय मी घेतला आहे. इलॉन मस्क यांच्यासोबत काम करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी होती. माझ्या संपूर्ण टीमने कठीण परिस्थितीत चांगले काम केले आहे. लिंडा याकारिनो यांची जागा कोण घेईल, हे अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही.