ब्लॉग: वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम!

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘यो’ पर्सनॅलिटी असलेला दिन्या आमच्या मित्रपरिवारातला हिरो. बालपणापासून अत्यंत हुशार, चुणचुणीत मुलगा. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरून त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा अदमास कुणाला येत नसे. पण आम्ही त्याचे कष्ट पाहिले होते. तो खराखुरा फिनिक्स होता, शून्यातून विश्व उभं करणारा!
दिन्याच्या घरात एक सोडून तीन तीन गाड्या सायडिंगला लागलेल्या. अंथरुणाला खिळलेली आई, भ्रमिष्ट झालेले बाबा आणि वृद्धापकाळाने कमरेत झुकलेले मधुमेही आजोबा. दिन्या न कुरकुरता तिघांची सेवा करायचा. एखादी गृहिणी राबावी, तसा तो घरचं सगळं आवरून नोकरीला जायचा.
घरच्यांचा त्याच्यावर फार जीव होता. आपल्यामुळे त्याचं आयुष्य अडलंय, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. दिवसभर कोमेजलेलं त्यांचं घर, रात्री एकत्र जेवताना फुलून यायचं. कारण, दिन्या त्या घराचा जीव होता.
दिन्याने लग्न करावं, असा घरच्यांनी धोशा लावला होता. त्याच्यावर भाळणाऱ्या अनेक जणी होत्या, पण दिन्यासकट त्याच्या घरच्यांना सांभाळून घेईल, अशी एकही नव्हती. आपल्यासारखं आणखी कोणा मुलीला घरच्यांच्या सेवेला लावणं, दिन्याला पटत नव्हतं. नकार देऊन घरच्यांचा हिरमोड करण्याऐवजी, त्याने कसंबसं त्यांना थोपवून धरलं होतं.
दिन्याच्या आजोबांना रोज इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायला एक नर्स यायची. आपुलकीने तिघांची चौकशी करायची. हे तिघेही तिच्या येण्याकडे डोळे लावून बसायचे. तेवढाच त्यांचाही वेळ छान जायचा. दिन्याची आणि तिची गाठभेट झाली नव्हती. दिन्या ऑफिसहून येण्याआधीच ती निघून जायची.
दिन्याच्या आईने एकदा पलंगावरून पडल्या पडल्या सहज तिची चौकशी केली. तीही विवाहेच्छुक निघाली. मात्र, तिच्याही घरचे २ डबे सायडिंगला लागलेले. म्हणून तिची गाडी यार्डात अडकलेली.
आजोबांना तिच्यात भावी सून दिसू लागली. त्यांनी मोबाईलमधला दिन्याचा फोटो दाखवला. ती लाजली. आनंद झाल्यामुळे इंजेक्शन घेऊनही आजोबांच्या रक्तातली साखर वाढली. तिने थेट होकार न देता, तिच्या घरचा मुद्दा अधोरेखित करत निरोप घेतला.
तिकडी कामाला लागली. रात्रीच्या जेवणात त्यांनी दिनुकडे विषय काढला. मुलीचा फोटो दाखवला आणि तिची अडचण सांगितली. दिनूने तिला भेटायची कबुली दिली. एका संध्याकाळी तो लवकर घरी आला. दोघांची भेट झाली. बघता क्षणीच दोघांनी परस्परांना पसंती दर्शवली. पण दोन्ही घरात रुग्णांची मुख्य समस्या होती. दिन्याने सर्वांनी एकत्र राहण्याचा पर्याय सुचवला. तिच्या प्रत्येक कामात मदतीची तयारी दाखवली. तिनेही दोन्हीकडच्या पेशंटना सांभाळण्याची तयारी दाखवली. लग्न झाले. दोन कुटुंबं एकत्र आली.
दिन्याचे घर वृद्धाश्रम झाले. दोघांनाही सेवेची सवय असल्यामुळे घरच्या मंडळींची अडचण झाली नाही. उलट सगळे समदु:खी एका छताखाली आले आणि समसुखी झाले. दिन्याला कल्पना सुचली. त्याने वृद्धाश्रमाचे पर्यवसान आनंदाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. बायकोनेही सहमती दर्शवली. दोघांनी नोकरी सोडली. सगळी सेव्हिंग ओतून वास्तूचे नूतनीकरण केले. लोकांना आवाहन केले. प्रतिसाद मिळू लागला. घराघरातली ‘नकोशी’ झालेली ‘गाठोडी’ आनंदाश्रमात येऊन पडू लागली. कालपर्यंत सायडिंगला असलेल्या गाडीला एक-एक करून डबे जोडले गेले. रखडलेल्या आयुष्यांची गाडी वेग घेऊ लागली. येणाऱ्या थोड्याफार मिळकतीतून दिन्याने सेवाभावी वृत्तीचा स्टाफ नेमला. त्यांच्यासह दिन्या सपत्नीक घरच्या आणि बाहेरून आलेल्या रुग्णांची मनोभावे सेवा करू लागला. हळू हळू दिन्याच्या परिश्रमाला अनेक सेवाभावी संस्थांकडून आर्थिक मदत येऊ लागली. सुटीच्या दिवशी बाहेरचे लोक येऊन वृद्धांना, रुग्णांना उपयोगी पडतील अशा वस्तू भेट म्हणून देऊ लागले. स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. एका निपुत्रिक धनिकाने त्याच्या मालकीची जागा दिन्याच्या नावावर केली. कालांतराने त्या जागेवर दिन्याने अधिकृत नोंदणी करून ‘कल्पतरू’ नावाचा आनंदाश्रम बांधला. दिन्या कल्पतरुचा संस्थापक झाला, तर त्याची बायको व्यवस्थापक!
कल्पतरुच्या छायेत निष्पर्ण झालेले, थकलेले, कोलमडलेले अनेक वृक्ष विसावले. काही दिवसांपूर्वी दिन्याचे आजोबा निवर्तले, पण लवकरच ते पुन्हा दिन्याच्या घरी येताहेत, दिन्याच्या कल्पतरूचे आजीव सभासदत्व घेण्यासाठी!

summary- blog by jyotsna gadgil on old age home

आपली प्रतिक्रिया द्या