रक्तपेढय़ा रक्ताचे नव्हे, तर प्रक्रियेचे शुल्क आकारतात; पल्लवी रक्तपेढीचे संचालक जयसिंग विश्वकर्मा यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रासह देशभरातील अनेक खासगी आणि सामाजिक संस्थांकडून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर रक्तपेढय़ा चालवल्या जात आहेत. या रक्तपेढय़ा रक्तदात्यांकडून घेतलेले रक्त गरजू रुग्णांपर्यंत पोहचवण्याचे नियोजनबद्ध काम करतात. त्यासाठी आकारले जाणारे शुल्क म्हणजे रक्ताची किंमत नव्हे, तर सदर रक्तावर कराव्या लागणाऱया विविध चाचण्यांचे आणि प्रक्रियेचे शुल्क असते अशी माहिती गोवंडी येथील पल्लवी फाऊंडेशन संचलित पल्लवी रक्तपेढीचे संचालक जयसिंग विश्वकर्मा यांनी दिली.

सर्व रक्तपेढय़ा नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल (एनबीटीसी), स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल (एसबीटीसी) आणि एफडीएने घालून दिलेल्या नियमानुसारच काम करतात. मात्र सध्या खासगी आणि सामाजिक संस्थांकडून चालवल्या जाणाऱया रक्तपेढय़ा गरजूकडून रक्ताची किंमत वसूल करत आहेत असा गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत बोलताना मानवी रक्ताची किंमतच होऊ शकत नसल्याचे जयसिंग विश्वकर्मा यांनी सांगितले. रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलित करून रक्तपेढीत आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून एचआयव्ही, एचबीसी, एचबीव्ही, व्हीडीआरएल, मलेरिया, अॅण्टीबॉडी स्क्रिनिंग, रक्तगट तपासणी आदी चाचण्या केल्या जातात. त्यापोटी प्रति रक्तपिशवीमागे सुमारे 1450 रुपये शुल्क सरकारनेच निश्चित केले आहे. तसेच रक्ताच्या एलायन्झा, केमिनिसेन्स, नॅट आदी विशेष चाचण्यांसाठी सुमारे दोन-अडीच हजार रुपयांचा खर्च सरकारनेच निश्चित केलेला आहे. त्यानुसारच रक्तपेढय़ा रक्ताच्या प्रतिपिशवीमागे शुल्क आकारणी करतात. तरीही रक्तपेढय़ांबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले.

रक्तपेढी चालवण्यांचा खर्च मोठा

सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक संस्था रक्तपेढी चालवतात. त्यासाठी 24 तास डॉक्टरची व्यवस्था करावी लागते. तसेच तांत्रिक सुपरवायझर, चार-पाच तंत्रज्ञ, दोन सहाय्यक तंत्रज्ञ, दोन पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर, नर्स, पब्लिक अटेंडंट आदी कार्मचाऱयांची नियुक्ती करावी लागते. त्याचबरोबर वीज, पाणी, जागा भाडे आदी मासिक खर्च असतो. सदर खर्च करणे एकटय़ा रक्तपेढीला परवडणे शक्य नाही. त्यामुळेच सर्व चाचण्या आणि प्रक्रिया शुल्कापोटी रक्ताच्या एका पिशवीला पंधराशे रुपये घेतले जातात. तसेच गरजूकडे रक्तदात्याचे कार्ड असेल तर अवघ्या दोनशे रुपयांमध्ये रक्ताची पिशवी उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर थॅलेसेमिया, अप्लास्टिक, अॅनेमिया, सिकलसेल अशा रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.