
सामना प्रतिनिधी । मालवण
पावसाळा कालावधीत आपतकालीन परिस्थिती केव्हाही निर्माण होते. यात जीवित व वित्त हानीच्या घटना घडतात. मात्र आपतकालीन परिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी मालवण दांडी येथील ११ तरुणांनी एकत्र येत ‘ब्लू आर्मी दांडी बॉईज’ या ग्रुपची स्थापना जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली आहे.
समुद्र-नदी व अन्य कोणत्याही पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती बुडल्यास अथवा वाहून गेल्यास, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, डोंगर खचल्यास, दरड कोसळल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती ओढवल्यास ‘ब्लु आर्मी’ प्रशासकीय यंत्रणेसोबत मदत कार्यात प्रमुख भूमिका निभावणार आहे. वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी ग्रुपचे सदस्य सज्ज असणार आहेत. अशी माहिती ग्रुपचे युवा सदस्य अन्वय प्रभू यांनी दिली.
‘ब्लू आर्मी’ मध्ये ढोले बाबू, अन्वय प्रभू, रुपेश प्रभू, मुन्ना पराडकर, अक्षय रेवंडकर, भाई जाधव, सुमंत लोणे, महेश कोयंडे, नाना जाधव, शेखर जाधव, सुजित मोडकर या सदस्यांचा सहभाग असणार आहे. पोलीस प्रशासनास या ग्रुपबाबत माहिती देण्यात आली आहे. तर सर्वच प्रशासकीय यंत्रणांना याबाबत पत्र देत संपर्क क्रमांकही दिले जाणार आहेत. तसेच मालवणसह जिल्ह्यात कोठेही आपतकालीन परिस्थिती ओढवल्यास अन्वय प्रभू (९८२३८५७५७६) या नंबर संपर्क साधल्यास ग्रुप सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहचणार आहेत.
सामाजिक भावनेतून हे सेवा दिली जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणे सोबत राहून अथवा प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी ब्लु आर्मी आपतकालीन परिस्थितीत तात्काळ हजर असणार आहे. पाण्यात उतरण्यासाठी बोट, पाण्याखाली जाण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर अन्य साहित्य ग्रुपसोबत असणार आहे.
उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
आपतकालीन परिस्थितीत अनेक वेळा शासकीय यंत्रणा वेळेत पोहचत नाही. काही वेळा साधन सामुग्री अथवा कुशल मनुष्यबळ यात शासकीय यंत्रणा कमी पडते. अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र आपतकालीन परिस्थितीत तात्काळ मदतकार्य मिळण्यासाठी सेवाभावी वृत्तीने स्थापन झालेल्या या ‘ब्लू आर्मी’चे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाड दुर्घटना शोध मोहिमेत सहभाग
ब्लु आर्मी ग्रुप मधील ढोले बाबू हे व्यक्तिमत्त्व आपतकालीन अथवा अपघात परिस्थितीत सेवा व मदत करण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. महाड सावित्री नदी पूल दुर्घटनेत नदी पात्रात मृतदेह शोध मोहिमेत ढोले बाबू, अन्वय प्रभू यांच्यासह दांडी-मालवण येथील सदस्य पाच दिवस सहभागी होते. तसेच अन्य आपतकालीन परिस्थितीत या सदस्यांनी मदतकार्य केले आहे.





























































