
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल 93.25 टक्के लागला असून यामध्ये तब्बल 76 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील संकू संजीवा अंजनेयुलु व विलेपार्ले मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील महेक इलेशकुमार गांधी यांनी 96 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.
दहावीच्या परीक्षेला पालिकेच्या 218 शाळांमधून 13637 विद्यार्थी बसले होते. यातील 12 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालिका विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या निकालात प्रभादेवी पालिका माध्यमिक शाळेतील हिना अर्जुन तुळसकर हिने 95.40 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक तर सांताक्रुझ पश्चिम येथील पालिका माध्यमिक उर्दू शाळेतील कुलसूम तारीक या विद्यार्थिनीने 94.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. शिवाय सांताक्रुझ पश्चिम येथील पालिका माध्यमिक (हिंदी) शाळेतील यादव रूपेश आर. याने 94.40 टक्के गुण मिळवून चौथा तर चारकोप सेक्टर नं. 1 पालिका माध्यमिक शाळेतील (हिंदी) खान सकिना अब्दुल हाय हिने 94.20 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे.
गेल्या पाच वर्षांचा निकाल
वर्ष – टक्केवारी
2016 – 77.22
2017 – 68.91
2018 – 73.81
2019 – 53.15
2020 – 93.25
40 टक्क्यांची विक्रमी वाढ
गेल्या वर्षी पालिकेचा दहावीचा निकाल 53.15 टक्के लागला होता. मात्र यावर्षी या निकालात तब्बल 40.10 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे निकाल 20.66 टक्क्यांनी घटला होता. पालिकेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना 27 मोफत शालेय वस्तूंसह दर्जेदार मोफत शिक्षण दिले जाते. यामुळे पालिका शाळांतील गुणवंत विद्याथ्र्यांची संख्याही वाढत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नवनवीन अत्याधुनिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामुळेच यावर्षी दहावीच्या निकालात तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाल्याची प्रतिक्रिया शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली.
























































