हॉलतिकीट, सुपरवायझर, कडेकोट सुरक्षा; दहावीचा निकाल वाढवण्यासाठी पालिका इन ऍक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हॉलतिकीट, वेळेवर प्रवेश, कडेकोट सुरक्षा, सुपरवायझरची नजर आणि बैठक व्यवस्था अशा वातावरणात बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे पालिकेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा  ऑक्टोबरपासूनच घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून, त्यांचा सराव वाढवून निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या वर्षी पालिका शाळांचा दहावीचा निकाल तब्बल 20.67 टक्क्यांनी घटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिका शाळांचा दहावीचा निकाल गेल्या वर्षी 73.81 टक्के लागला होता, मात्र या वर्षी 53.14 टक्के लागला. दहावीच्या परीक्षेत शाळांकडून देणारे अंतर्गत 20 गुण बंद केल्यामुळे राज्याचा निकाल 12 टक्क्यांनी तर पालिका शाळांचा निकाल तब्बल 20.67 टक्क्यांनी घसरल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल वाढवण्यासाठी ठोस पावले उचलताना शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पालिका अधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन निकाल वाढवण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या. यानुसार सप्टेंबरपर्यंत दहावीचा अभ्यासक्रम संपवून ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत.

अशी होणार कार्यवाही

  • बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देणार
  • बोर्डाप्रमाणेच प्रश्नसंच, निर्धारित वेळ दिला जाईल
  • विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुसर्‍या शाळांचे शिक्षक तपासणार
  • निकालानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करून ट्रेनिंग देणार

शिक्षक स्वीकारणार शिक्षणासाठी पालकत्व

ज्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत कमी गुण मिळतील किंवा जे विद्यार्थी नापास होतील अशा विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आवश्यक त्या विषयांचे खास टेनिंग दिले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गटाचे शिक्षक शिक्षणासाठी पालकत्व घेतील. या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी, जादा गुण मिळवण्यासाठी तयार करतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती जाण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून दहावीचा निकाल वाढण्यास मदत होईल, असे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.