भेंडीबाजार पुनर्विकासाचा तिढा अखेर सुटला! 24 भूखंडांच्या बदल्यात पालिकेला मिळाली पर्यायी जागा आणि 21 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

गेल्या सात वर्षांपासून रखडलेला आणि मुंबईतील पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प असलेला भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प आता वेगाने मार्गी लागणार आहे. या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या 24 छोटय़ा भूखंडांच्या बदल्यात पालिकेला विकासकाकडून भुलेश्वर आणि मांडवी येथे पर्यायी जागा आणि ‘फरका’चे 21 कोटी रुपये मिळणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी मिळाली आहे. यामुळे पर्यायी मिळालेल्या जागेवरील इमारतींच्या पुनर्विकासालाही गती मिळणार असल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

भेंडी बाजार हा मुंबईतील पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. सात वर्षांपूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. या ठिकाणी दोन इमारतीही उभ्या राहिल्या. मात्र यानंतर हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात पालिकेच्या 24 छोटय़ा भूखंडांवर पालिकेचे 424 भाडेकरू आहेत. हे भूखंड पालिकेचे असल्याने भेंडी बाजार क्लस्टर डेव्हलपमेंटलाही फटका बसत होता. त्यामुळे या भूखंडांच्या बदल्यात संबंधित सैफी बुऱहानी अप्लिपमेंट ट्रस्टने भुलेश्वर या ठिकाणी पर्यायी जागा देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या भूखंडांपासून 1 कि.मी. अंतरावरच ही पर्यायी जागा मिळाली आहे. या जागेची पाहणी सुधार समितीकडूनही करण्यात आली. त्यामुळे सुधार समितीत मांडलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ला गती, पालिकेला महसूल

n मुंबईतील पहिलाच आणि आदर्श ठरणारा, मात्र सात वर्षे रखडलेला क्लस्टर डेव्हलपमेंट भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होणार असल्याने ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ मोहिमेला गती मिळणार. हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने अनेक प्रकल्प मार्गी लागतील.
n पालिकेच्या छोटय़ा भूखंडावर असलेल्या भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार. पालिकेला दोन ठिकाणी एकत्र जागा मिळाल्याने पुनर्विकासासाठी विकासक पुढे येणार असून पालिकेला प्रीमियम, लीज अशा स्वरूपातून महसूल मिळणार.

अशी मिळणार पर्यायी जागा

n भेंडी बाजार येथील जागेच्या बदल्यात पालिकेला मांडवी विभाग बाबुला टँक रोड येथे 4097 चौ. मी. जागा मिळणार आहे. या ठिकाणच्या इमारतीत सध्या 137 निवासी घरे तर 83 अनिवासी बांधकामे आहेत.
n भुलेश्वर विभाग मौलाना आझाद मार्ग येथे 447.70 चौ.मीटर जागा मिळणार आहे. या ठिकाणी सध्या 154 निवासी तर 50 अनिवासी बांधकामे आहेत. आगामी काळात या ठिकाणी पुनर्विकास मार्गी लागणार आहे.