
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांची 1388 पदे लवकरच भरली जाणार आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड यादी येत्या 29 किंवा 30 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून झालेल्या या कामगार भरती प्रक्रियेचा अखेर आता मार्ग मोकळा झाला आहे. 1 डिसेंबरला निवड झालेल्या कामगारांना प्रत्यक्ष कामावर हजर राहता येणार आहे.
पालिकेच्या 1388 चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीच्या परीक्षेवरून मोठाच वाद झाला होता. ऑनलाइन घेण्यात आलेल्या या परीक्षेत अतिशय कठीण प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप करून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते व निवड प्रक्रियेवर स्थगिती आली होती. त्यामुळे अखेर पुन्हा परीक्षा घेणार की काय अशी शक्यताही निर्माण झाली होती. मात्र नंतर या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी केलेल्या आंदोलनानंतर ही परीक्षा योग्य असल्याचा अहवाल पालिका प्रशासनाने दिल्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली होती. मात्र त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या भरतीबाबत काहीच निर्णय होत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. आता मात्र येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निवड यादी जाहीर करणार असल्याचे प्रशासनानेच जाहीर केले आहे.
कामगार भरतीचे वेळापत्रक जाहीर
पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार या कामगार भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
- अंतिम निवड यादी जाहीर करणे – 29 किंवा 30 ऑक्टोबर
- अंतिम निवड यादीतील उमेदवारांना वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू करणे – 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर
- निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करणे – 12 ते 17 नोव्हेंबर
- वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्यांची पालिकेच्या वैद्यकीय मंडळातर्फे तपासणी करणे – 19 नाव्हेंबर ते
22 नोव्हेंबर - उमेदवारांच्या खात्यांतर्गत नेमणुकीसंबंधीची सोडत – 26 नोव्हेंबर
- नियुक्ती प्राप्त झाल्यानुसार उमेदवारांनी उपस्थित राहण्याचा दिवस – 1 डिसेंबर



























































