
सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेच्या सेवेत असणारे श्रमिक, शिपाई आणि कामगार चक्क कनिष्ठ अभियंते बनले आहेत. त्यामुळे एकेकाळी केवळ साहेबांच्या हाताखाली काम करणारे कामगार सेवासुविधांच्या कामांवर देखरेख ठेवणार आहेत. पालिकेच्या विविध खात्यांत असणाऱ्या कामगारांनी अभियांत्रिकेची पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे ही संधी मिळाली आहे. खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेल्या एकूण 55 कर्मचाऱ्यामध्ये 8 कामगार, 5 श्रमिक आणि तीन शिपायांचा समावेश आहे.
पालिकेच्या विविध खात्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी या वर्षी कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये 20 टक्के पदे पदविका उत्तीर्ण झालेल्या आणि पालिकेच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यामधून भरण्यात आली आहेत. अभियांत्रिकी पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्याची कनिष्ठ अभियंता म्हणून निकड करण्यासाठी नगर अभियंता विभागामार्फत समिती गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत विद्यापीठांनुसार पदविका शिक्षणाची सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. या भरतीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे.
दुय्यम अभियंता भरतीचा निकाल जाहीर
पालिकेतील 190 स्थापत्य, 92 यांत्रिकी व विद्युत आणि 9 वास्तुशास्त्रज्ञ अशा एकूण 291 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यासाठी तब्बल 82 हजारांहून अधिक अर्ज आले होते. यामध्ये परीक्षेत 50 टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मेरीट लिस्ट पालिकेच्या ‘एमसीजीएम’ वेबसाइटवर आरक्षण निहाय प्रसिद्ध केली असून अंतिम निवड यादीही प्रसिद्ध केली जाईल.
अशी झाली निवड
शिपाई – 3, सुरक्षा रक्षक – 2, कामगार – 8, श्रमिक – 5, संनिरीक्षण अन्वेषक – 5, समन्वयक 3, कनिष्ठ आवेक्षक – 2, अग्निशामक- 2, लिपिक – 19 आणि स्वीपर, वाहनचालक, गटार स्वच्छक, आलेखक, जलद्वार नियंत्रक, कनिष्ठ सर्वेक्षक – प्रत्येकी 1
























































