मलेरिया, डेंग्यूची 20 हजारांहून जास्त ठिकाणे नष्ट; जून महिन्यात पालिकेची मोहीम

423

कोरोना आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरू नये म्हणून पालिकेने कंबर कसली असून जून महिन्यांत राबवलेल्या मोहिमेत विविध ठिकाणची डेंग्यू, मलेरियाची तब्बल 20 हजार 194 ठिकाणे शोधून नष्ट केली. याआधी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत राबवलेल्या मोहिमेत 1 लाख 8 हजार 26 वस्तू हटवून संभाव्य धोका कमी केला होता.

मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जातात. यासाठी मुंबईभर मुंबई महापालिकेचा कीटकनाशक विभाग ही मोहीम नियमितपणे राबवत असतो. यावेळी कोरोना आणि त्याचवेळी पावसाळा असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार निर्माण होऊ नये, यासाठी विविध ठिकाणच्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशी एकूण 1 लाख 72 हजार 572 ठिकाणे तपासून त्यातील मलेरिया पसरवणारी 4 हजार 601 ठिकाणे नष्ट करण्यात आली. डेंग्यूच्या संभाव्य अळ्या सापडणाऱ्या पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई आणि मनी प्लांटची झाडे अशी एकूण 53 लाख 92 हजार 754 ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यात 15 हजार 593 डेंग्यूच्या अळ्यांची ठिकाणे सापडली. ती नष्ट करण्यात आली.

पाणी साचू देऊ नका!
अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची पिंप भरून ठेवलेली आहेत. लोक गावी गेल्यामुळे या पिंपांमध्ये डेंग्यूच्या अळ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. पावसाळ्यात छपरावरील प्लॅस्टिक/टारपोलिनवर पाणी साचते. तिथे तसेच आवारात, गच्चीवर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून राहिल्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा प्रसार होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर, घरात आणि घराबाहेरील भांड्याकुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या