गोरेगावात शिवसेनाच; अंकित प्रभू यांचा भाजपवर दणदणीत विजय, विप्लव अवसरे यांच्यावर 11 हजार मते मिळवून केली मात

गोरेगाव पूर्वेकडील प्रभागांमध्येही शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांनीच वर्चस्व राखले. शिवसेना पक्षावरील मतदारांची निष्ठा तसेच शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांची विकासकामांना प्राधान्य देण्याची कार्यपद्धती या जोरावर गोरेगाव पूर्व परिसरात शिवसेनेनेच वर्चस्व राखले. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांनी भाजप महायुतीचे उमेदवार विप्लव अवसरे यांची धूळधाण उडवली. प्रभाग क्रमांक 54 मध्ये अंकित प्रभू यांनी 11,197 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला.

गोरेगावमधील इतर प्रभागांमध्येही शिवसेनेची ‘मशाल’ धगधगली. मतदारांनी शिवसेनेशी असलेली निष्ठा मतांच्या माध्यमातून दाखवून दिली. प्रभाग क्रमांक 53 मध्ये शिवसेनेचे जितेंद्र वळवी, प्रभाग क्रमांक 56 मध्ये शिवसेनेच्या लक्ष्मी भाटिया तब्बल 11,455 मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 57 मध्ये शिवसेनेच्या रोहन शिंदे यांनी कडवी लढत दिली. त्यांनी प्रत्येक फेरीमध्ये चांगली मते मिळवत 4250 मतांवर मजल मारली. प्रभाग क्रमांक 58 मध्ये मनसेचे उमेदवार विरेन जाधव यांनी 8155 मते मिळवल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचे धाबे दणाणले.

वरळीत मशाल उजळली, आदित्य ठाकरेंना मतदारांची साथ

मतदारांनी मतांच्या रूपात आशीर्वाद दिला – सुनील प्रभू

गोरेगावच्या जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली साथ दिली आणि आशीर्वाद दिले. त्या आशीर्वादाचे रूपांतर मतांमध्ये होऊन शिवशक्तीचे उमेदवार अंकित प्रभू व शिवसेनेचे इतर उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड जल्लोष, गुलालाची उधळण

गोरेगाव आणि मालाडमधील मतमोजणी केंद्रांबाहेर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जल्लोष होता. निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून प्रत्येक फेरीतील मते जाहीर होताच कार्यकर्ते मोठय़ा उत्साहाने आणि विजयाच्या विश्वासाने फटाक्यांची आतषबाजी करीत होते.