सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पालिका कर्मचाऱयांनाही आता सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. याबाबत महापौर, पालिका आयुक्त आणि कर्मचारी संघटनांसोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वेतन कराराबाबत सकारात्मक चर्चा झाली. सुधारित वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 5 फेब्रुवारीपासून मॅरेथॉन बैठका होणार आहेत. पालिकेच्या लाखो कर्मचाऱयांना याचा फायदा होणार आहे.
पालिका कर्मचाऱयांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर प्रिंन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, खासदार राहुल शेवाळे, आमदार ऍड. अनिल परब आणि कामगार समन्वय समिती प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका कर्मचाऱयांच्या मागील करारात राहिलेल्या त्रुटी दूर करणे आणि नवीन करारासाठी कार्यवाही सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले. यावर पालिका आयुक्त अजोय यांनी सातव्या वेतन आयोगासह सर्व मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी समन्वय समितीचे ऍड. महाबळ शेट्टी, ऍड. सुखदेव काशीद, वामन कविस्कर, अशोक जाधव, बाबा कदम, सत्यवान जावकर, ऍड. प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, दिवाकर दळवी, सुभाष पवार, के. पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, यशवंत धुरी, सूर्यकांत पेडणेकर आदी उपस्थित होते.
- 1 ऑगस्टपासून स्थगित असलेली वैद्यकीय विमा योजना
- सातव्या वेतन आयोग करारानुसार अंतिम पगारवाढीपोटी रु. 50, 60 आणि 75 हजार देणे
- खासगीकरण रद्द करणे, रिक्त पदे भरणे
- कर्मचाऱयांना जुन्या कर्मचाऱयांप्रमाणे पेन्शन लागू करणे
लवकरच थकबाकीही मिळणार
सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देतानाच बंद पडलेली गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सातव्या वेतन आयोगाची 36 महिन्यांची थकबाकीदेखील लवकरच अदा केली जाईल असे आश्वासनही आयुक्तांनी दिले. यासंदर्भात पालिकेच्या उद्या सोमवारी जाहीर होणाऱया अर्थसंकल्पात निधीची तरतूद जाहीर होण्याची शक्यता आहे.





























































