क्वारंनटाइन न करण्यासाठी लाच, पालिका अभियंत्यासह तिघांना अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्यासाठी लाच घेणाऱया दुय्यम अभियंत्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणी एकूण तीन जणांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, हवाईमार्गे मुंबईत येणाऱया प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये,असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई  विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) दिनेश गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱया प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत असल्याची तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांनी हेरली.

हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर असलेले पालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनाला आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली.

सीआयएसएफच्या मदतीने झडती घेऊन त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य आस्थापनांचे दोघेदेखील संशयित म्हणून आढळले आहेत. दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गावंडे याच्यासह एकूण 3 जणांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गावंडेसह तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या