पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज निर्णय घ्या, अन्यथा उद्या मोर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी पालिका आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर बुधवारी पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा आज पालिका कामगार कर्मचारी समन्वय समितीने दिला आहे. दरम्यान, आगामी काळात प्रशासनाने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर गणेशोत्सवानंतर ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

बायोमेट्रिक प्रणाली रद्द करा, सामुदायिक गटविमा योजना लागू करा, सहाव्या वेतन आयोगातील करारातील विसंगती दूर करा आदी मागण्यांबाबत पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे. वारंवार पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये आश्वासनांनंतरही निर्णयाबाबत चालढकल केली जात आहे. त्यामुळे पालिकेतील सर्व कामगार संघटना एकत्र आल्या असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करून वेतनाशी जोडण्यात आली आहे. मात्र बायोमेट्रिकमध्ये त्रुटी असल्याने हजेरी लावूनही कर्मचाऱ्यांचा पगार कापला जातो आहे. गटविमा योजना बंद आहे. मात्र कर्मचाऱ्यांना मिळणारा वैद्यकीय भत्ताही दिला जात नाही. त्यांना औषधांसाठी आलेला खर्च, ज्यांनी शस्त्रक्रिया केली आहे, त्यांची बिले प्रशासनाने विनाविलंब दिली पाहिजेत. सहाव्या वेतन आयोगातील करारातील राहिलेली वेतन विसंगती दूर करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून निर्णय घेण्याचे मान्य करूनही या कमिटीची एकही बैठक झालेली नाही. स्वच्छतेच्या संबंधित काम करणाऱ्या कामगारांना 2005 पासून ‘लाड-पागे’ समितीच्या शिफारशी लागू कराव्यात याबाबतचे पालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत, तरी प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. यावेळी समन्वय समितीचे बाबा कदम, सुखदेव काशिद, महाबळ शेट्टी, वामन कविस्कर, सत्यवान जावकर, प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, सुभाष पवार, दिनकर दळवी, के. पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर, के. के. सिंह आदी आदी उपस्थित होते.