
सामना प्रतिनिधी । मुंबई
सफाईच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असताना आठवडा उलटला तरी कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा सर्व 24 वॉर्डमध्ये काम बंद आंदोलन करू’ असा इशारा समन्वय समितीने दिला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा कचराकोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेने कचरा उचलणे आणि सफाईचे काम नियमित कर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि मुलुंडमध्ये याची अंमलबजावणी सुरू केल्याने हे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकिरोधात कामगारांनी 13 नोक्हेंबरपासून कांदिकली, बोरिवली, दहिसर व मुलुंड या चार विभागांत सलग चार दिवस काम बंद आंदोलन केले. यामुळे जागोजागी मुंबईत कचऱ्याचे ढीग साचले होते. प्रशासनाने याची दखल घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी आहे त्याच ठिकाणी सफाई कामगारांचे समायोजन केले जाईल अशी ग्वाही समन्वय समितीला प्रशासनाने दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आठवडा उलटला तरी याबाबत प्रशासनाने कामगारांच्या समायोजनाबाबत कोणताही निर्णय दिला नसल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे समन्वय समितीचे सुखदेव काशिद यांनी सांगितले.
सोमवारी तोडगा काढावाच लागणार
आठवडा उलटला तरी प्रशासनाने निर्णय घेतला नसल्यामुळे शेकडो हंगामी कर्मचाऱ्यांसह ‘कायम’ कर्मचाऱ्यांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यासोबत सोमवारी 3.30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. यावेळी कामगारांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करावेच लागेल असेही ते म्हणाले.
पालिका प्रशासनाने कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. समन्वय समितीही संयमाची भूमिका घेईल अशी आशा आहे. लवकरच यावर तोडगा निघेल. मुंबईत कचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती




























































