मुंबई महापालिकेकडून दीड लाख बेघर-कामगारांना दररोज अन्नपदार्थांचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज नऊ लाख चपात्या, 31 हजार किलो भाजी आणि 90 हजार किलो खिचडी किंवा पुलाव देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका एक लाख 57 हजार बेघर आणि स्थलांतरित कामगारांचा सांभाळ करीत आहे. या उपक्रमात दररोज दोन वेळच्या जेवणासाठी 3 लाख14 हज़ार अन्न पाकिटांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. ‘कोरोना’च्या संकटात पालिकेकडून सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोरोनामुळे लॉक-डाऊन जारी झाल्याने अनेक स्थलांतरित कामगार घरी जाऊ शकले नाहीत. तर बाजारपेठ, उपहारगृह इत्यादी बंद असल्यामुळे त्यांच्या रोजच्या जेवणाचीही सोय होणे कठीण आहे. त्यामुळेच मुंबईत अडकलेल्या या कामगारांच्या रोजच्या जेवणाची सोय माणुसकीच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अंतर्गत 1 लाख 57 हजारांपेक्षा अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर व्यक्ती, यांच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी दररोज तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक चपात्या, 31 हजार किलो भाजी किंवा या ऐवजी 95 हजार किलो पुलाव वा खिचडी यांचे वितरण केले जात आहे.‌ हे वितरण करण्यासाठी ‘बेस्ट’च्या बस गाड्या वापरण्यात येत असून स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष वितरण करताना नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेतले जात आहे. 30 मार्च 2020 पासून बृहन्मुंबई महापालिकेमार्फत दोन वेळच्या जेवणासाठी मोफत अन्न पाकिटे देण्यास सुरुवात करण्यात आली. या प्रत्येक पाकिटामध्ये 3 चपात्या, 100 ग्रॅम भाजी इत्यादी देण्यात येत आहेत. तर कधी या ऐवजी सुमारे 350 ग्रॅम खिचडी किंवा पुलाव, अथवा राजमा चावल देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या सेवेची सुरुवात केली, तेव्हा सुमारे 14 हजार 500 गरजू व्यक्तींना अन्नपदार्थांची पाकिटे वितरित केली जात होती. आता ही संख्या वाढून दररोज तब्बल 1 लाख 57 हज़ार व्यक्ती एवढी झाली आहे. तसेच हेल्पलाइनवर येणाऱ्या विनंतीनुसार या आकड्यात वाढही नोंदविली जात आहे.

400 ठिकाणी व्यवस्था, ‘बेस्ट’चेही सहकार्य
पालिकेच्या या उपक्रमात 1 लाख 57 हजारांपेक्षा अधिक स्थलांतरित कामगारांच्या आणि बेघर व्यक्तींच्या रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी सकाळ आणि संध्याकाळ मिळून 3 लाख 14 हज़ारांपेक्षा अधिक पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण निश्चित करण्यात आलेल्या सुमारे 400 पेक्षा अधिक ठिकाणी निर्धारित वेळी दररोज करण्यात येत आहे. यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाच्या गाड्यांचा वापर करण्यात येत आहे.

संपर्क साधा, मदत मिळवा
स्थलांतरित कामगार व बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणासाठी या अन्नपदार्थांच्या पाकिटांचे मोफत वितरण 30 मार्चपासून सुरु करण्यात आले. तेव्हा पहिल्या दिवशी सकाळ – संध्याकाळ मिळून 14 हजार 500 पाकिटांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘कोरोना कोविड 19’ विषयक ‘हेल्पलाईन’ वर याविषयीच्या सूचना व विनंती नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत दूरध्वनी क्रमांक 1800-22-12-92 यावर संपर्क साधल्यानंतर व स्थलांतरित कामगारांबाबत आवश्यक ती माहिती दिल्यानंतर अन्न पाकिटे वितरणासाठी संबंधितांचा तपशील लिहून घेण्यास व आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

विविध संस्था, दानशुरांचे सहकार्य
या उपक्रमासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचा अतिशय मोलाचा हातभार लागत आहे. तर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी महापालिकेशी संबंधित महिला बचत गट देखील मोलाचे सहकार्य करीत आहेत. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल पालिकेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.