जानेवारीपासून पालिकेचे सर्व दवाखाने सकाळी 8 वाजता सुरू होणार

318
प्रातिनिधिक

जानेवारी 2020 पासून पालिकेचे सर्व दवाखाने सकाळी 8 वाजता सुरू होणार आहेत. सध्या या दवाखान्यांची वेळ सकाळी 9 ते 4 अशी असल्यामुळे सकाळी लवकर कामावर जाणाऱया नोकरवर्गाला पालिकेच्या या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळेच पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सर्वपक्षीय गटनेता बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.

शिवाय सायंकाळी 4 वाजल्यानंतर दवाखाने बंद होत असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते. तसेच पालिकेच्याच दवाखान्यात उपचार घ्यायचे असल्यास कामावर जायला उशीर होतो किंवा  सुट्टी घ्यावी लागते. शिवाय दवाखान्यांच्या ठरावीक वेळेमुळे पालिकेच्या मोफत रुग्णसेवेचा लाभ घेऊ शकत नसणाऱया गोरगरीबांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नोकरदारांच्या सुविधेसाठी पालिकेचे दवाखाने सकाळी 9 ऐवजी 8 वाजता सुरू करावेत अशा मागणीचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गटनेता बैठकीत मांडला होता. दवाखाने सकाळी 8 वाजता उघडल्यास मधुमेही रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या जानेवारीपासून पालिकेचे दवाखाने सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

सायंकाळी 4 ते रात्री 11 वेळेतील दवाखाने वाढणार

नोकरवर्गाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा म्हणून आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या पाठपुराव्यातून पालिकेचे 15 दवाखाने सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पालिकेने अलीकडेच घेतला आहे. सध्या खासगीरीत्या हे दवाखाने वाढीव वेळेत चालवले जात असून सायंकाळी 4 ते रात्री 11 या वेळेत आरोग्य सुविधा देणाऱया दवाखान्यांची संख्या आगामी काळात वाढवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनेक नोकरदार रुग्णांना सेवेचा लाभ मिळत नाही

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण 186 दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेचा लाभ हजारो रुग्ण घेत असले तरी याचदरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कर्मचाऱयांच्या कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणाऱया नोकरवर्गाला पालिकेच्या या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या