एक रुग्ण सापडला म्हणून पूर्ण इमारत सील करणार नाही, बहुमजली इमारतींमध्ये नवे नियम

1660

‘कोरोना’मुळे देशभरात ‘चौथा’ लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रुग्णवाढ रोखण्यासाठी पालिकेने प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एखाद्या इमारतीत एक रुग्ण आढळला म्हणून संपूर्ण इमारत सील करण्यात येणार नाही. तर संबंधित ठिकाणची परिस्थिती पाहून एक मजला किंवा इमारतीचा संबंधित भाग सील केला जात आहे. यामुळे बहुमजली इमारतींमध्ये या नियमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येणार आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिकेने कंटेनमेंट झोनची पुनर्रचना करून अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार ‘कंटेनमेंट झोन’ आणि ‘सीलबंद इमारती’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पुनर्रचनेनंतर ६६१ कंटेनमेंट झोन आणि ११० इमारती सील करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पुनर्रचनेआधी मुंबईत एकूण २ हजार ८०१ कंटेनमेंट झोन होते. शिवाय याआधी एखाद्या इमारतीत रुग्ण सापडल्यास सरसकट संपूर्ण इमारत सील करण्यात येत होती. मात्र नवीन आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सुचनेनुसार कंटेनमेंट झोनची पुनर्रचना करताना छोटे भाग वेगळे करून त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलीस आणि पालिकेच्या मनुष्यबळावरील ताण कमी होणार असल्याचे पालिका प्रशासनाच म्हणणे आहे. यामध्ये रुग्ण सापडलेला मजला सील करून त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. संबंधित सोसायटीशी चर्चा करून ते क्षेत्र सील केले जाईल. या ठिकाणी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सोसायटीच्या समितीच्या माध्यमातून नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अशी होतेय अंमलबजावणी

  • पॉझिटिव्ह आणि लक्षणे असलेल्या रुग्णांना डीसीएचसी किंवा डीसीएच सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते.
  • घरीच क्वारेंटाइन असलेले आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर सोसायटी नजर ठेवून असेल. नियम पाळले जात नसल्यास ही बाब पालिका किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. सोसायटीची समिती यामध्ये विशेष भूमिका निभावत आहे.
  • सील केलेल्या इमारतीत प्रवेश करणे, बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली असून आवश्यक सुविधा ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’, पालिका-पोलीस कर्मचारी यांच्या समन्वयातून इमारतीच्या गेटवर दिल्या जात आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या