
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 17 टक्के पाणीसाठय़ाचा तुटवडा आहे. असे असले तरी मुंबईकरांना जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडीया यांनी स्थायी समितीत दिली. या वर्षी पाणीसाठा कमी असला तरी राखीव कोटय़ातील पाणी वापरण्यात येणार असल्यामुळे जादा पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले.
- मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यावेळी सातही तलावांत वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते, मात्र या वर्षी 1 ऑक्टोबरला तब्बल 2 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले.
- या वर्षी मुंबईकरांना पुरेसे पाणी कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने राज्य सरकारकडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोटय़ाचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पुरेसा पाणीपुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नसून तोपर्यंत आवश्यक असणारे पावसाचे पाणी जमा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्के पाण्याचा तुटवडा
- जूनअखेर राखीव कोटा वापरणार
- गेल्या वर्षी सातही तलावांत मिळून आजच्या दिवशी 39 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र या वर्षी आजच्या दिवशी हाच साठा फक्त 22 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 17 टक्क्यांनी कमी आहे.
- उपलब्ध पाणीसाठय़ातून पावसाळय़ापर्यंत पुरेशा पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी मुंबईत आणखी पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पाणीसाठय़ाची स्थिती
- 3 मे 2018 – 427777 दशलक्ष लिटर
- 3 मे 2019 – 243051दशलक्ष लिटर
तलाव 2019 2018
- अप्पर वैतरणा 959 –
- मोडक सागर 44271 64394
- तानसा 29374 35793
- विहार 3481 8816
- भातसा 118832 178976
- तुळशी 2878 3055
- मध्य वैतरणा 43256 136743



























































