पालिकेच्याच कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर, कॅटरर्सला 40 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

प्लॅस्टिकविरोधात पालिकेकडून मुंबईभर जोरदार कारवाई सुरू असताना चक्क पालिकेच्याच कार्यक्रमात बंदी घातलेल्या प्लॅस्टिकमधून जेवण पुरवणाऱया कॅटरर्सला 40 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पालिकेच्या जी-उत्तर विभागाने आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला.

राज्यात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर पालिकेने मुंबईत प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्लॅस्टिक व थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली. मार्केट, आस्थापना आणि परवाना विभागातील 310 अधिकाऱयांची निरीक्षक म्हणून नेमणूक करून कारवाई केली जात आहे. मुंबईत 68 ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रेही सुरू  करण्यात आली आहेत, मात्र तरीदेखील अजूनही काही दुकानदार, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. कारवाई करूनही काही प्लॅस्टिकचा वापर शंभर टक्के बंद झाला नाही. विशेष म्हणजे जी-उत्तर (दादर) वॉर्ड ऑफिसमध्येच आयोजित कार्यक्रमात जेवण पुरवणाऱया कॅटरर्सने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकमधून जेवण आणले. शिवाय जेवणासाठी प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, पाण्याचे ग्लास आणले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सहायक आयुक्त आणि ‘स्वच्छ भारत’ अभियान समन्वयक किरण दिघावकर यांनी सांगितले.

अशी झाली कारवाई
पालिकेच्या कार्यक्रमात जेवण पुरवणाऱया कॅटरर्सला 25 हजारांचा दंड, कॅटरर्सने ज्याच्याकडून पॅकिंग करून घेतले त्याला  10 हजारांचा दंड तर प्रतिबंधित प्लॅस्टिक पुरवणाऱयाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

फूलविक्रेतेही रडारवर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दादर फूल मार्केटमध्ये फूल विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांमधून झेंडू आणि इतर फुले दिली जात होती. याची दखल घेऊन गेल्या तीन दिवसांत जी-नॉर्थ विभागाकडून जोरदार कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 80 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे तर दहा हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.