मुंबईत लसीकरणासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये तीन व्हॅक्सिनेशन सेंटर, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होत असून पालिकेने आपली यंत्रणा सक्षम ठेवली आहे.  यामध्ये दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून संपूर्ण मुंबईत 72 म्हणजेच प्रत्येक वॉर्डमध्ये किमान तीन लसीकरण सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. यातच आता लसीकरण सुरू होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

केंद्राकडून लसीकरणासाठी डोस उपलब्ध होणार असल्याने कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग, कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेज सेंटर तयार करण्यात येत आहे. याठिकाणी एक कोटी लस साठवता येतील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोविड आजाराच्या प्रतिबंधानंतर हे सेंटर नियमित लसिकरणासाठी वापरले जाणार आहे. आगामी काळात लसीकरण सेंटर वेगाने वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

मृत्यू दरात कमालीची घट

मुंबईत सद्यस्थितीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी एक वर्षपेक्षा जास्त झाला असून मृत्यूदरही 3.5 टक्क्यांवर खाली आला आहे. कोरोना वेगाने वाढत असताना मृत्यूदर 12 टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे मुंबईत आता कोरोना स्थिती मियंत्रणात आला आहे.

तीन टप्प्यात लसीकरण

मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार 3 टप्प्यात करण्यात  येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी (Health Care Worker), दुसऱया टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी (Front Line Worker) उदा. स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱया टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

पहिल्या व दुसऱया टप्प्यासाठी केंद्रशासनाने Co-WIN हा डिजिटल मंच विकसित केला आहे. त्या माध्यमातून पहिल्या व दुसऱया टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. नजीकच्या काळात तिसऱया टप्प्यात नागरिकांनासाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.