पालिकेच्या 10 शाळांत सीबीएसई बोर्ड! आदित्य ठाकरे यांची संकल्पना

पालिका शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत सुविधा असणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या आणखी 10 शाळा पालिका सुरू करणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या शाळांमध्ये ज्युनियर केजी, सीनियर केजी आणि पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. 2021-22 शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू केले जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेकडून इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. पालिका शाळांत 1214 डिजिटल वर्ग सुरू आहेत. या शाळांत ई-वाचनालय, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, बालकोत्सव, पथनाटय़, सहली, शिक्षणोत्सव, संगीत स्पर्धा, श्लोक स्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे मुलांच्या गुणवत्तेत दर्जात्मक वाढ होत आहे. मात्र याच दरम्यान पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे.

जागतिकीकरणात टिकून राहण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळेत परवडत नसतानाही प्रवेश घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना मांडली होती. या पार्श्वभूमीवर के-पूर्व विभागात जोगेश्वरीतील पूनम नगरात  प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करण्यात आली आहे. त्याला शिक्षण समितीची मान्यता मिळाली आहे, तर वरळीत आसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे.

या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेकडून इतर विभागातही अशा प्रकारच्या शाळा सुरू केल्यास दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. पालिका शाळांतील मराठी, हिंदी, गुजराती, तमीळ, तेलगू, कन्नड तसेच एमपीएस शाळांना, विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या सर्व सुविधा सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही दिल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लॉटरी पद्धतीने 90 टक्के प्रवेश होणार

सीबीएसई शाळांमधील 90 टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने तर 5 टक्के महापौरांच्या शिफारशीनुसार दिले जाणार आहेत. तसेच 5 टक्के प्रवेश महापालिका कर्मचाऱयांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. पालिकेच्या 10 शाळात शिशुवर्ग ते सहावीपर्यंत एकेक तुकडी सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

या ठिकाणी होणार शाळा

जी उत्तर  भवानी शंकर रोड शाळा

एफ उत्तर  काने नगर मनपा शाळा

के पश्चिम  प्रतीक्षा नगर मनपा शाळा

एल  तुंगा क्हिलेज, नवीन इमारत

एन  राजावाडी मनपा शाळा

एम पूर्व 2  अझीझ बाग मनपा शाळा

पी उत्तर  दिंडोशी मनपा शाळा

पी उत्तर  जनकल्याण नवीन इमारत

टी  मिठानगर शाळा, मुलुंड

एस  हरियाली क्हिलेज, मनपा शाळा, विक्रोळी

आपली प्रतिक्रिया द्या