पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच काही शाळांत अजूनही वहय़ा नाहीत, शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरले

शैक्षणिक वर्ष अर्धे संपल्यानंतरही काही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप वह्याच मिळाल्या नाहीत. या उदासीनतेबद्दल शिवसेना नगरसेवकांनी शिक्षण समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाला धारेवर धरले.

पालिका शाळातील विद्यार्थ्यांना मुंबई पालिकेतर्फे 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. मुलांना शालेय पुस्तकांबरोबर वह्याचेही वितरण केले जाते. पण गेले 6 महिने काही शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्या नसल्याचे शिवसेनेचे राहुल कनाल यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावर वह्या पुरवणारा कंत्राटदार टेंडर प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने वह्या पुरवण्याची प्रकिया थांबली आहे, असे उत्तर पालिका प्रशासनाने दिले. यावर  CSR फंडातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे शक्य आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या देता आल्या असत्या, असे उपस्थित सदस्यांनी सांगितले. त्यावर सहआयुक्त आशुतोष सलील यांनी आपली चूक मान्य केली. त्यादृष्टीने कार्यवाही करून वह्या मिळाल्या नसलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वह्या दिल्या जातील असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

30 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर पगारातून वस्तू द्या!

पालिका शाळेतील मुलांना सर्व वस्तू वेळेवर मिळाल्या पाहिजेत. कारण त्यामुळे मुलांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत मुलांना वह्या द्या, नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पगारातून वहय़ा पुरवाव्यात, असे सक्त निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिले.

‘एसआयसी’बद्दल ठोस निर्णय घ्या!

पालिका प्रशासन स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर सेल (एसआयसी) च्या माध्यमातून पालिका शाळांना पायाभूत सुविधा पुरवते. पण काही शाळांची अवस्था बिकट आहे. काही शाळांमध्ये पाण्याची जोडणी रखडली आहे, काही शाळांच्या आवारातील पेव्हर बॉक्स उचकटलेले आहेत. शाळांच्या दुरुस्तीबाबत ठोस धोरण पालिका प्रशासन राबवत नाही. त्यामुळे एसआयसीचे ठोस धोरण ठरवा, आणि त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या