
कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या पालिकेच्या विद्यार्थ्यांनी आता पुणे येथे सुरू असलेल्या उपक्रमात दोन उपग्रह बनवले आहेत. हे उपग्रह 19 फेब्रुवारी रोजी चेन्नई कपट्टीपुरम येथील कल्पकम अॅटोमिक सेंटरमधून रॉकेटने अवकाशात सोडले जाणार आहेत. या उपक्रमासाठी पालिकेच्या शाळांमधील 20 विद्यार्थी आज विमानाने चेन्नईला रवाना झाले आहेत.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन संस्थेने 21 जानेवारीला पुणे, परभणी, नागपूर येथे कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये पुणे येथे 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपग्रह (सॅटेलाइट) बनवले असल्याची माहिती पालिकेच्या गुरू गोविंदसिंग मराठी महापालिका शाळेच्या शिक्षिका व या उपक्रमाच्या मुंबईमधील प्रमुख रंजना पाटील यांनी दिली. बाल वैज्ञानिकांची निर्मिती, लहान मुले, विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था माजी राष्ट्रपती कलाम यांनी स्थापन केली आहे. ही संस्था हिंदुस्थानसह 14 देशांत कार्यरत आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून ‘ए. पी. जे. एसएलव्ही 23’ हे मिशन राबवले जात आहे. या मिशनच्या अंतर्गत 150 उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. यासाठी आर्थिक सहाय्य तामीळनाडूतील मार्टिन पंपनी करीत असून स्पेस झोन ऑफ इंडिया, चेन्नईच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.
शिवजयंतीदिवशी 150 उपग्रह सोडणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी 19 फेब्रुवारी रोजी चेन्नई कपट्टीपुरम येथील कल्पकम अॅटोमिक सेंटर येथून एकाच वेळी विद्यार्थ्यांनी बनवलेले सुमारे 150 उपग्रह सबऑर्बिटमध्ये सोडले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात एक विद्यार्थी या उपग्रहांची पाहणी करेल. यानंतर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पणतू छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील. त्यानंतर हे उपग्रह रॉकेटच्या माध्यमातून सबऑर्बिटमध्ये सोडले जाणार आहेत.
































































