पालिकेच्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

288

पालिकेच्या विद्यार्थ्यांना आता अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देण्यात येत आहेत. मुंबईसारख्या शहरातही अनेक वेळा अंद्धश्रद्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आणि भीतीचे वातावरण तयार होते. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

देशाची आर्थिक राजधानी आणि औद्योगिक शहर असलेल्या मुंबईतही मांजर आडवी जाणे, पाल अंगावर पडणे, अंगात येणे, जादूटोणा अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवली जात आहे. सर्वेक्षणातून अशा बाबी समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका वंदना साबळे यांनी ठरावाची सूचना मांडून हा प्रकार रोखण्याची मागणी केली आहे. अंधश्रद्धांमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पालिका शाळांतील 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना अंधश्रद्धा निर्मूलन तज्ञांकडून मार्गदर्शन करावे अशी मागणीही साबळे यांनी केली होती.

याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देताना अंधश्रद्धांमुळे निर्माण होणाऱया समस्यांमुळे जून 2019 पासून पालिका शाळांतील प्रशिक्षकांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर प्रशिक्षण देत असल्याचे स्पष्ट केले आहे. हे प्रशिक्षक वॉर्ड व विभाग स्तरावर 10 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळत असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीत सकारात्मक बदल होत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या