केवळ 800 दिव्यांगांना मिळणार स्कूटर, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना स्कूटर देण्यात येणार असून त्याकरिता अर्ज करण्यास नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दिव्यांगांना या स्कूटरसाठी पालिकेकडून वाढीव 70 हजार रुपये निधी दिला जाणार असून या योजनेअंतर्गत 1071 दिव्यांगांना स्कूटर देण्यात येणार होती. मात्र आता निधी वाढवल्यामुळे केवळ 816 दिव्यांगांना स्कूटर मिळू शकणार आहे.

दिव्यांगांना तीनचाकी स्कूटर देण्याची योजना प्रथमच पालिकेतर्फे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना रिअल साइड व्हील्ससह स्कूटर पुरवण्याची योजना राबवण्यात येत आहे. मात्र त्याकरिता दिव्यांगांना पालिकेकडे अर्ज करावे लागणार आहेत. पात्र उमेदवारांना आपल्या पसंतीची स्कूटर आधी खरेदी करावी लागणार आहे व त्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

800 ही पुरेशी संख्या
आजच्या घडीला मुंबईत 56 हजार अपंग आहेत. त्यापैकी 10 टक्के अपंग हे वाहन चालवत असतील असे गृहीत धरले तरी त्यातील अनेकांकडे आधीच स्कूटर असू शकते. तसेच केवळ 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे 800 ही पुरेशी संख्या आहे. अर्ज वाढल्यास मात्र लॉटरी काढावी लागेल.