
होळीसाठी झाड तोडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले असून झाड तोडणाऱयाकडून एक ते पाच हजारांचा दंड वसूल करण्यात येणार असून एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे होळीसाठी वृक्षतोड करू नये, असे पालिकेने म्हटले आहे.
पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 अंतर्गत कोणतेही झाड पूर्वपरवानगीशिवाय तोडणे कलम 21 नुसार अपराध ठरतो. या बेकायदेशीर वृक्षतोडीसाठी एक ते पाच हजारांचा दंड आकारला जातो. शिवाय एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 17 मार्च रोजी होणाऱ्या होळीसाठी वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांत तक्रार केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

























































