कचरा वाहतुकीतील कंत्राटदारांची झोलबाजी बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत जमा होणारा कचरा डंपिंग ग्राऊंडपर्यंत नेण्यामध्ये कंत्राटदारांकडून होणाऱ्या ‘झोलबाजी’ला आता चाप बसणार आहे. यासाठी डंपिंग ग्राऊंडवर येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या कचऱ्याच्या गाडीवर नजर ठेवणाऱ्या ‘वेइंग ब्रिज’ सिस्टममध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ आणली जाणार आहे.

पालिका क्षेत्रात दररोज जमा झालेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर गाडय़ांमधून नेला जातो. यामध्ये अनेक वेळा कंत्राटदारांकडून कचऱ्याच्या वजनात फसवणूक केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत होता. या गाडय़ांमधून चक्क डेब्रिज नेले जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डंपिंग ग्राऊंडवर कचरा घेऊन येणाऱ्या वाहनाचे ‘केइंग ब्रिज’च्या सहाय्याने व संगणकीय पद्धतीने वजन केले जाते. कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकल्यानंतर बाहेर पडणाऱ्या रिकाम्या वाहनाचे वजनदेखील याच पद्धतीने केले जाते. या दोन्ही वजनांमध्ये असणाऱ्या फरकाची संगणकीय पद्धतीने आकडेमोड केल्यानंतर वाहनातील कचऱ्याचे वजन निश्चित होते. या ‘वेइंग ब्रिज’ सिस्टममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी नवी प्रणाली आणण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याला दिले.

ऑनलाइन प्रमाणपत्र गोंधळ टाळण्यासाठी हमीपत्र

नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने आपल्या अनेक प्रमाणपत्रे, परवाने ऑनलाइन देणे सुरू केले असताना काहीजणांकडून याचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्त्यावर डान्स बार तर पालिका आयुक्तांच्या पत्त्यावर हुक्का पार्लर परवाना दिला गेल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी अर्जदाराला हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार हमीपत्र आणि प्रत्यक्ष ठिकाणच्या स्थितीमध्ये तफावत आढळल्यास गुन्हा नोंद केला जाणार आहे.