दादरमधील फुटपाथचा फोटो पाठवा, 24 ते 48 तासांत दुरुस्ती होणार!

653

खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने ‘खड्डा दाखवा, 500 रुपये मिळवा’ असा अभिनव उपक्रम राबवला असताना आता दादरमध्ये ‘खराब झालेल्या फुटपाथचा फोटो पाठवा आणि 24 ते 48 तासांत दुरुस्ती करून घ्या’ असा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी दादरकर-शिवाजी पार्कवासीयांसाठी पालिकेने व्हॉटस्ऍप ग्रुप तयार केला आहे. ‘जी-नॉर्थ’ने सुरू केलेल्या उपक्रमाला रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

शिवाजी पार्कसह दादरमधील अनेक फुटपाथवर दररोज हजारोंच्या संख्येने रहिवासी सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येत असतात, मात्र काही ठिकाणी फुटपाथवर खड्डे पडलेले असल्यास, फुटपाथ नादुरुस्त असल्यास ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांचीच गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर दर्जेदार फुटपाथ देण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम सुरू करताच पहिल्याच दिवशी 40 तक्रारी, दुसऱया दिवशी 20 तर तिसऱया दिवशी 15 तक्रारी आल्या. तक्रारी आल्यानंतर तातडीने दखल घेऊन संबंधित फुटपाथची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

…तर उपक्रमाची व्याप्ती वाढवणार

सध्या सुरू केलेला उपक्रम हा केवळ दादरकर-शिवाजी पार्कवासीयांसाठी राहणार आहे. या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना माहीमसह आणखी काही भागांसाठी व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली. दादरकर आपल्याला फुटपाथवरील खड्डा पाठवण्यासाठी My BMC wardGN या वेबसाइटवरही टॅग करू शकतात. तसेच रहिवाशांसाठी सुरू केलेल्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर तक्रार नोंदवली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या