पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी कार्यक्रम जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) 27 टक्के राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईसह 14 महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकांसह जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगर परिषदा यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना यापूर्वीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढण्यात येईल. ओबीसी आरक्षण सोडतीसाठी 28 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 29 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून 5 ऑगस्टला याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात येईल.

28 जुलैला जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपंचायतींची आरक्षण सोडत

आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 28 जुलैला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत निघेल. आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 29 जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. तर 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षण विहित नमुन्यात राजपत्रात प्रसिद्ध करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यातील 115 नगरपालिका आणि 9 नगर पंचायतींसाठी 28 जुलै रोजी ओबीसीसाठी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच ओबीसींना जागा

सर्वेच्च न्यायालयाने संबंधित महापलिका, जिल्हा परिषदेत ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मान्य केले आहे. मात्र समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत ओबीसी प्रवर्गासाठी जागा राखून ठेवाव्यात असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आरक्षण सोडतीचा आदेश निघाल्याने पावसाळा संपल्यानंतर लगेच निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहे.

महापलिका – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर,पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर
जिल्हा परिषदा – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.